केंब्रिज अॅनालिटिका कंपनीला केंद्र सरकारने पाठविली नोटीस; सहा प्रश्नांबाबत मागविला खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 05:37 AM2018-03-25T05:37:41+5:302018-03-25T05:37:41+5:30
फेसबुकच्या माध्यमातून ५ कोटी लोकांची वैयक्तिक माहिती अनधिकृतरित्या मिळवल्याच्या प्रकरणात वादात अडकलेल्या केंब्रिज अॅनालिटिका या ब्रिटिश राजयकीय डेटा विश्लेषक कंपनीने भारतीयांचीही माहिती मिळवल्याचा संशय आहे. त्यामुळे केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने त्या कंपनीला नोटीस पाठवली आहे.
नवी दिल्ली : फेसबुकच्या माध्यमातून ५ कोटी लोकांची वैयक्तिक माहिती अनधिकृतरित्या मिळवल्याच्या प्रकरणात वादात अडकलेल्या केंब्रिज अॅनालिटिका या ब्रिटिश राजयकीय डेटा विश्लेषक कंपनीने भारतीयांचीही माहिती मिळवल्याचा संशय आहे. त्यामुळे केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने त्या कंपनीला नोटीस पाठवली आहे.
तुमच्याकडून भारतीयांची माहिती कोणी मिळवली वा मिळवत आहे आणि ही माहिती मिळवण्यापूर्वी संबंधित भारतीयांची परवानगी घेतली होती का, आदी प्रश्न केंद्र सरकारने या कंपनीला विचारले आहेत.
केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने शुक्रवारी ही नोटीस केंब्रिज अॅनालिटिकाला पाठवली. २३ मार्च २०१८ रोजी केंब्रिज अनॅलिटिकाला ही नोटीस पाठवली आहे. या नोटिशीतकंपनीकडून सहा प्रश्नांची उत्तरे मागवली असून, ती ३१ मार्चपर्यंत द्यावीत, असेही कळवले आहे. प्रश्नांची उत्तरे न दिल्यास तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे कंपनीला कळवण्यात आले आहे.
फेसबुक युजर्सनी आपली वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नये असे आवाहन माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतीयांना केले आहे. आपले राहण्याचे व कामाचे ठिकाण, नोकरीची माहिती, राजकीय मते तसेच स्वत:ची ओळख पटवणारी अन्य कोणतीही माहिती फेसबुक वा सोशल मीडियावर ठेवू नये, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
भारतीयांच्या माहितीचा वापर करण्यामध्ये कंपनीचा सहभाग आहे का? तुमच्याद्वारे भारतीयांची माहिती मिळवणारे कोणकोण आहेत, अन्य कोणत्या कंपनीनेही माहिती मिळवली असेल तर ती कशी मिळवली, माहिती मिळवण्यासाठी संबंधित भारतीयांची संमती घेण्यात आली होती का, या लोकांची माहिती कंपनीपर्यंत कशी आली आणि मिळवलेल्या माहितीद्वारे नवी प्रोफाइल्स तयार केली आहेत का, असे प्रश्नही या पत्राद्वारे विचारण्यात आले आहेत.
लंडनमध्ये छापे!
लंडन : फेसबुक डेटाचोरीमुळे वादात सापडलेल्या केंब्रिज अॅनालिटिका (सीए)च्या लंडनमधील कार्यालयांवर ब्रिटिश नियमकांच्या वतीने शुक्रवारी छापे घालण्यात आले. माहिती आयुक्तांच्या कार्यालयातील १८ एजंटांनी कंपनीच्या मुख्यालयात रात्री प्रवेश केला. मध्यरात्रीपर्यंत तिथे तपासणी सुरू होती.
लंडनच्या उच्च न्यायालयाने कंपनीविरुद्ध
सर्च वॉरंटला परवानगी दिली होती. केंब्रिज अॅनालिटिकाने राजकीय हेतूने फेसबुक डेटा बेकायदेशीररीत्या मिळविला असावा, असा संशय आहे. न्या. जेम्स लिओनार्ड हे या प्रकरणाचा परिपूर्ण निकाल २७ मार्च रोजी देणार आहेत.
स्पेस एक्सचे फेसबुक पेज डिलीट
न्यूयॉर्क : डेटा चोरीमुळे सर्व स्तरांतून टीका होत असताना, प्रख्यात उद्योजक एलॉन मस्क आपली 'स्पेस एक्स' ही रॉकेट कंपनी आणि टेस्ला ही कार कंपनी यांचे फेसबुक अकाउंट डिलीट केले आहे. यामुळे अनेकांना मोठाच धक्का बसला आहे.फेसबुक पेज नसल्याचा आमच्या कंपन्यांना अजिबात फटका बसणार नाही. फेसबुक पेज नसल्याचा काहीच परिणाम होणार नाही, असे मस्क यांनी म्हटले आहे.