हिंदूच्या भावना दुखावल्यामुळे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना दिल्ली हायकोर्टाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 10:23 AM2018-04-07T10:23:03+5:302018-04-07T10:23:03+5:30
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या २०१६ मध्ये प्रकाशित पुस्तकातील अयोध्येतील बाबरी मशिदीच्या विध्वंसाशी संबंधित काही भाग हटविण्याची मागणी एका याचिकेव्दारे करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या २०१६ मध्ये प्रकाशित पुस्तकातील अयोध्येतील बाबरी मशिदीच्या विध्वंसाशी संबंधित काही भाग हटविण्याची मागणी एका याचिकेव्दारे करण्यात आली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने मुखर्जी यांच्याकडून उत्तर मागविले आहे. ‘टरब्यूलेंट इयर्स १९८०-१९९६’या पुस्तकाविरुद्ध एका सामाजिक कार्यकर्त्याने आणि वकिलांच्या समूहाने एक याचिका दाखल केली आहे. या पुस्तकात प्रणव मुखर्जी यांनी रामजन्मभूमीबाबत जो उल्लेख केला आहे त्यामुळे हिंदू जनभावना दुखावल्या गेल्या आहेत त्याचमुळे ही नोटीस बजावली गेल्याचे कोर्टाने म्हटले आहे. न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंग यांनी ही नोटीस बजावली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलैला होणार आहे
या प्रकरणी उत्तर देण्यासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पुस्तक छापणाऱ्या रुपा पब्लिकेशनला ६ आठवड्यांची मुदत दिली आहे. रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद या दोन्हींबाबत जे लिखाण प्रणव मुखर्जी यांनी केले आहे त्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. प्रणव मुखर्जी यांच्या या पुस्तका संदर्भात सामाजिक कार्यकर्ते यु. सी. पांडे यांनी एक याचिका दाखल केली होती. बाबरी मशिद पाडण्यात आली त्याचे वर्णन ज्याप्रकारे या पुस्तकात करण्यात आले आहे त्यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे याचिकाकर्ते यु. सी. पांडे यांनी म्हटले आहे.