नोटाबंदीपूर्वीच बँकेत 2.5 लाख भरलेल्यांना येऊ शकते नोटीस
By admin | Published: January 8, 2017 02:40 PM2017-01-08T14:40:52+5:302017-01-08T15:02:12+5:30
प्राप्तिकर विभागानं बँक आणि पोस्टाला 1 एप्रिल 2016 ते 9 नोव्हेंबर 2016पर्यंत बचत खात्यातील पैसे भरल्याची माहिती मागवली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - नोटाबंदीच्या निर्णयाआधी जर तुम्ही बँकेत 2.5 लाख रुपये भरले असल्यास तुम्हालाही प्राप्तिकर विभागाकडून नोटीस येण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर विभागानं बँक आणि पोस्टाकडे 1 एप्रिल 2016 ते 9 नोव्हेंबर 2016पर्यंत बचत खात्यातील पैसे जमा केलेल्यांची माहिती मागवली आहे.
अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार प्राप्तिकर विभागानं ही माहिती बँकांकडून मागितली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस(सीबीडीटी)ने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. अर्थ मंत्रालयानं यापूर्वीच 2.5 लाखहून अधिक रक्कम जमा असलेल्या बचत खात्याची आणि 12.5 लाखांहून अधिक रक्कम जमा असलेल्या चालू खात्यांची माहिती मागितली आहे.
अधिसूचनेनुसार, प्राप्तिकर विभागाने खातेधारकांना बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत पॅन नंबर किंवा फॉर्म 60 जमा करण्यास सांगितले आहे. ज्या खातेधारकांनी स्वतःचा पॅन नंबर दिला नाही, अशांसाठी ही अधिसूचना आहे. बँकांकडून मिळालेल्या माहितीचा वापर अध्ययनासाठी केला जाणार आहे. त्यामुळे या खात्यांमधील डिपॉझिटची माहिती मिळणार आहे, असंही स्पष्टीकरण प्राप्तिकर विभागानं दिलं आहे