गुगल, याहू इंडियाला नोटीस
By admin | Published: August 19, 2015 01:13 AM2015-08-19T01:13:28+5:302015-08-19T01:13:28+5:30
गर्भ लिंगनिदान जाहिराती रोखण्याचा न्यायालयाने आदेश देऊनही त्याचे उल्लंघन केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी गुगल इंडिया, याहू इंडिया
नवी दिल्ली : गर्भ लिंगनिदान जाहिराती रोखण्याचा न्यायालयाने आदेश देऊनही त्याचे उल्लंघन केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी गुगल इंडिया, याहू इंडिया आणि मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशनला नोटीस जारी करीत दोन आठवड्यांत उत्तर मागितले आहे.
गर्भ लिंगनिदान जाहिरातींवर भारतात प्रतिबंध असतानाही सदर कंपन्यांकडून कायद्याचे उल्लंघन केले जात आहे, असे साबू मॅथ्यू जॉर्ज यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटले होते. जॉर्ज यांचे वकील संजय पारिख यांनी त्याकडे लक्ष वेधले असता दीपक मिश्रा आणि आर. बानूमथी यांच्या खंडपीठाने या सर्च इंजिन कंपन्यांना दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. संपूर्ण जगभरात सर्च इंजिन कंपन्यांना अशा जाहिराती रोखण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. भारतातही तसा आदेश देण्यात आला असता न्यायालयीन अधिकारक्षेत्र आणि तांत्रिक समस्येचा मुद्दा उपस्थित केला जात आहे, असे अॅड. पारिख यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)