मोदींना नोटीस!
By admin | Published: July 19, 2014 02:55 AM2014-07-19T02:55:34+5:302014-07-19T02:55:34+5:30
पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांच्या वाराणशी मतदारसंघातून लोकसभेवर झालेल्या निवडणुकीस अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले
अलाहाबाद : पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांच्या वाराणशी मतदारसंघातून लोकसभेवर झालेल्या निवडणुकीस अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, न्यायालयाने या याचिकेवर मोदींना नोटीस जारी केली आहे.
या निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार आमदार अजय राय यांनी ही याचिका केली असून, मोदींची निवड अवैध ठरवून रद्द करावी, अशी त्यात विनंती केली गेली आहे. न्या. व्ही.के. शुक्ला यांनी या याचिकेवर मोदी यांना नोटीस काढण्याचे आदेश गुरुवारी दिले व पुढील सुनावणी ५ सप्टेंबर रोजी ठेवली.
उमेदवारी अर्जात किंवा त्यासोबतच्या प्रतिज्ञापत्रात उमेदवाराने कोणताही रकाना कोरा सोडला असेल तर निवडणूक अधिकारी असा अर्ज अवैध म्हणून फेटाळू शकतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मोदी यांनी आपली पत्नी यशोदाबेन यांच्या पॅनकार्डाचा तपशील व त्यांचे उत्पन्न याविषयीचे रकाने कोरे सोडले होते. त्यामुळे मुळात त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला जाणेच बेकायदा होते, असा मुद्दा राय यांनी याचिकेत मांडला आहे.
याखेरीज मोदी यांनी निवडणूक खर्चाच्या निश्चित मर्यादेहून जास्त खर्च केल्याचा आरोप करताना याचिका म्हणते की, लोकसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा ७० लाख रुपये असताना मोदी यांनी प्रत्यक्षात प्रचारावर कोट्यवधींचा खर्च केला. शिवाय वाराणशी मतदारसंघात मोदींचे नाव आणि छायाचित्र छापलेले टी-शर्ट आणि टोप्या मोठ्या प्रमाणावर वाटून आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केला गेला, असेही राय यांनी याचिकेत प्रतिपादन केले आहे. वाराणशी जिल्ह्याच्या पिंडरा विधानसभा मतदारसंघातील आमदार असलेल्या राय यांना मोदींविरुद्ध लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळून त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली होती. (वृत्तसंस्था)