भगवान शिव हाजीर हो! देवाला न्यायालयाचे समन्स; गैरहजर राहिल्यास १०,००० दंडाची तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 06:18 AM2022-03-26T06:18:37+5:302022-03-26T06:19:04+5:30
हजर न राहिल्यास सर्वांना १० हजार रुपये दंड आणि जागेतून बाहेर काढण्याचा इशारा
- खुशालचंद बाहेती
रायपूर : छत्तीसगडच्या रायगड येथील तहसीलदार न्यायालयाने एका विचित्र आदेशात, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाच्या सुनावणीत भगवान शिव यांच्यासह १० जणांना समक्ष हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. हजर न राहिल्यास सर्वांना १० हजार रुपये दंड आणि जागेतून बाहेर काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सुधा राजवाडे यांनी १६ जणांविरुद्ध सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याची याचिका हायकोर्टात दाखल केली होती. रायगड शहरातील प्रभाग क्रमांक २५ मधील कोहकुंडा परिसरातील शिवमंदिरही यात आहे. हायकोर्टाने राज्य सरकार आणि तहसीलदारांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
प्राथमिक तपास आणि पाहणीतून १० जणांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले. यात शिवमंदिराचाही समावेश आहे. या १० जणांना तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी कोर्टाने नोटीस बजावली आहे.
तहसीलदारांच्या नोटिशीत शिवमंदिराचे नाव क्रमांक ६ वर आहे. नोटीस मंदिराच्या विश्वस्त, व्यवस्थापक किंवा पुजारी यांना दिलेली नसून थेट भगवान शंकराला पाठविण्यात आली आहे. तहसीलदार कोर्टाच्या नोटीसमध्ये भगवान शिव यांना तुमचे कृत्य छत्तीसगड जमीन महसूल संहितेअंतर्गत गुन्ह्याच्या श्रेणीत येते. याचा जाब देण्यासाठी निश्चित केलेल्या तारखेला न्यायालयात हजर राहावे. न राहिल्यास १० हजार रुपयांचा दंड तसेच ताब्यात असलेल्या जमिनीतून निष्कासनास सामोरे जावे लागू शकते, असे नमूद केले आहे. देवाने जमिनीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये, असेही निर्देश दिले आहेत.
तहसीलदार विक्रांतसिंह ठाकूर यांनी ही नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. सरकारी मालमत्तेवरील अतिक्रमणाचा हा खटला आहे.
पहिल्यांदाच नाही
यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये, छत्तीसगड पाटबंधारे विभाग (चंपा जिल्हा) उपविभागीय अधिकारी जंजगीर-शाखा कालवा उपविभाग क्र. १ यांनी त्यांच्या मालकीची मालमत्ता रिकामी करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशी विनंती देवाला केली होती.
नोटीसमध्ये कोणत्याही ट्रस्ट किंवा समितीचा उल्लेख नव्हता. पटवारी हलका क्रमांक १० जंजगीर शाखा कालव्यातील १९८८ चौरस फूट जागेवर आपण अतिक्रमण केले असून सरकारी जमीन ताब्यात घेणे हा गुन्हा आहे, असेही भगवान भोलेनाथ यांना लिहिले होते.