‘जुबाँ केसरी’ म्हणणाऱ्या कलाकारांना नोटिसा; केंद्र सरकारची लखनऊ खंडपीठाला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 10:40 AM2023-12-11T10:40:05+5:302023-12-11T10:40:39+5:30
अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाच्या अवमानना याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्राने ही माहिती शुक्रवारी दिली.
नवी दिल्ली : आरोग्यासाठी घातक गुटखा आणि पान मसाल्याच्या जाहिराती केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेते अक्षयकुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना केंद्र सरकारने नोटिसा बजावल्या आहेत. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाच्या अवमानना याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्राने ही माहिती शुक्रवारी दिली.
यावर सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू असल्याने लखनऊ खंडपीठासमोरील याचिका अवमानना याचिका फेटाळावी, अशी मागणी केंद्र सरकारच्या वकिलांनी केली आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या एक सदस्यीय पीठाने ही याचिका दाखल केली होती. (वृत्तसंस्था)
पद्म सन्मानितांकडून ही अपेक्षा नाही
याचिकाकर्त्यांचे वकील मोतीलाल यादव यांचे म्हणणे आहे की, हे तीनही अभिनेते पद्म सन्मानित आहेत. त्यांच्याकडून अशा जाहिरातींची अपेक्षा नाही. यामुळे लोकांची मने विचलित होऊ शकतात. करार संपल्यानंतरही जाहिराती दाखविल्याने अभिनेते अमिताभ बच्चन यांनी गुटखा कंपन्यांना नोटीस बजावल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली.