लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना, २० राज्यांतील ९१ मतदारसंघांत ११ एप्रिलला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 06:06 AM2019-03-19T06:06:15+5:302019-03-19T06:06:27+5:30
देशातील २० राज्यांतल्या ९१ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिलला मतदान होणार असून, त्या संदर्भातील अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली.
नवी दिल्ली - देशातील २० राज्यांतल्या ९१ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिलला मतदान होणार असून, त्या संदर्भातील अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली.
या निवडणुकांत केंद्रातील सत्ता टिकविण्याचा भाजपाकडून, तर त्या पक्षाला हरविण्याचे काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून आटोकाट प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्याबाबतची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी केलेली अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे. निवडणुका होऊ घातलेल्या मतदारसंघांमध्ये सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून, ती २५ मार्चपर्यंत चालणार आहे. या अर्जांची २६ मार्च रोजी छाननी होईल. त्यानंतर, २८ मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. त्या दिवशी संध्याकाळी ९१ लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची एकूण संख्या किती आहे, ते कळू शकेल.
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये आंध्र प्रदेश (२५), अरुणाचल प्रदेश (२), आसाम (५), बिहार (४), छत्तीसगड (१), जम्मू-काश्मीर (२), महाराष्ट्र (७), मणिपूर (१), मेघालय (२), मिझोरम (१), नागालँड (१), ओडिशा (४), सिक्किम (१), तेलंगणा (१७), त्रिपुरा (१), उत्तर प्रदेश (८), उत्तराखंड (५), पश्चिम बंगाल (२), अंदमान आणि निकोबार बेटे (१), लक्षद्वीप (१) या ठिकाणी मतदान होणार आहे.
तेलंगणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
हैदराबाद : लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिलला मतदान होत आहे. तेलंगणामध्ये सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या राज्यात उमेदवारांचे अर्ज २५ मार्चपर्यंत स्वीकारण्यात येतील.
डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुकांत दणदणीत विजय मिळविल्यानंतर, त्याचीच पुनरावृत्ती आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये होईल, असा विश्वास सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या पक्षाला वाटत आहे. राज्यात लोकसभेच्या १७ जागा असून, त्यापैकी १६ जागा टीआरएस लढविणार असून, एक जागा एआयएमआयएम या मित्रपक्षाला देण्यात आली आहे.
टीआरएसचे प्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी करीमनगर येथून प्रचारमोहिमेचा प्रारंभ केला. ते म्हणाले की, भाजपा व काँग्रेसने जनतेच्या भल्यासाठी काहीही भरीव काम केलेले नाही. या दोन पक्षांचा मुकाबला करण्यासाठी देशात पर्यायी संघराज्य राजकारण अस्तित्वात आले पाहिजे. त्यासाठी मी महत्त्वाची भूमिका बजावण्यास तयार आहे. देशामध्ये वेगाने सुधारणा घडविण्यासाठी वेळप्रसंगी राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली. मात्र, टीआरएसने अजून उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. डाव्या पक्षांचे काही आमदार गेल्या काही महिन्यांत टीआरएसमध्ये गेल्यामुळे ते पक्ष काहीसे हताश आहेत. (वृत्तसंस्था)
एमआयएम आघाडी
आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहदुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी हैदराबादमधून उमेदवारी दाखल केली. दुर्बल, वंचित गटांचा आवाज हैदराबादमधून बुलंद केला जातो. यापुढेही हे कार्य आम्ही असेच सुरूच ठेवू, असे ओवेसी म्हणाले. २००४ सालापासून ते हैदराबादमधून सातत्याने लोकसभेवर निवडून येत आहेत. टीआरएसने एआयएमआयएमला पाठिंबा जाहीर केला आहे.