भारताकडून कुख्यात गँगस्टर लखबीर सिंह लांडा दहशतवादी घोषित; हत्या, बॉम्बस्फोटासह २० गंभीर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 01:44 PM2023-12-30T13:44:38+5:302023-12-30T13:50:38+5:30
एनआयएच्या विशेष न्यायालयाने यावर्षीच लखबीर सिंह लांडा याची तरणतारण जिल्ह्यात असलेली संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते.
नवी दिल्ली : कॅनडामध्ये वास्तव्यास असणाऱ्या लखबीर सिंह लांडा याला केंद्र सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दहशतवाद विरोधी कायद्यानुसार (UAPA) ही कारवाई करत लखबीर सिंह लांडा याचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत केला आहे. "मोहाली येथील पंजाब स्टेट इंटेलिजेन्स हेडक्वार्टरवर झालेल्या हल्ल्यात लखबीर सिंह लांडा याचा सहभाग होता. तसंच अनेक ठिकाणी वसुली, हत्या, बॉम्बस्फोट, हत्यारांसह अमली पदार्थांच्या तस्करीत तो सक्रिय आहे," अशी माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या लखबीर सिंह लांडा याचा जन्म १९८९ साली पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यात झाला होता. लहानपणापासूनच विविध गुन्ह्यांत सहभागी असलेल्या लखबीर याने २०१७ साली कॅनडामध्ये पलायन केलं. खलिस्तानवाद्यांशी संबंधित असलेला लखबीर सिंह लांडा याने ९ मे २०२२ मध्ये मोहालीमध्ये रॉकेटच्या मदतीने ग्रेनेड हल्ला केला होता. तेव्हापासून राष्ट्रीय तपास पथक त्याच्या शोधात आहे.
NIAने जाहीर केलं बक्षीस
लखबीर सिंह लांडा याच्या शोधात असलेल्या एनआयएने त्याच्यावर १० लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. एनआयएच्या माहितीनुसार, सध्या तो कॅनडा येथील अल्बर्टा परिसरात राहात आहे. बब्बर खालसासह भारतविरोधी अनेक संघटनांशी त्याचा संबंध असल्याची माहिती आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने यावर्षीच लखबीर सिंह लांडा याची तरणतारण जिल्ह्यात असलेली संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, लखबीर सिंह लांडा याच्यावर हत्या, वसुली, अमली पदार्थ तस्करी असे २० विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आता त्याला दहशतवादी घोषित केल्यानंतर भारताकडून त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.