आता लवकरच येणार 200 रुपयाची नोट
By admin | Published: June 29, 2017 08:29 AM2017-06-29T08:29:26+5:302017-06-29T09:03:14+5:30
नोटाबंदीनंतर 500 आणि 2000 रुपयांची नोट चलनात आल्यानंतर आता केंद्र सरकार लवकरच 200 रुपयांची नोटही व्यवहारात आणण्याच्या तयारीत आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - नोटाबंदीनंतर 500 आणि 2000 रुपयांची नोट चलनात आल्यानंतर आता केंद्र सरकार लवकरच 200 रुपयांची नोटही व्यवहारात आणण्याच्या तयारीत आहे. भारतीय रिझर्व्ह बँककडून 200 रुपयांच्या नोटेचं छपाईकाम सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सर्वसामान्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत आणि सुलभ होण्याच्या हेतून 200 रुपयांची नोट आणणार असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.
काळा पैसा, बनावट नोट आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारनं देशात नोटाबंदी निर्णय लागू केला. या निर्णयानुसार 500 व 1000 रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्या. यानंतर 500 व 2000 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, मार्चमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान आरबीआयनं 200 रुपयाची नोट व्यवहारात आणण्याचा निर्णय घेतला.
नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांना चलनतुटवड्याचा सामना करावा लागला होता. पण, आता 200 रुपयाची नोट व्यवहारात आल्यानंतर मोठा दिलासा मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, काही दिवसांपूर्वी आरबीआयने 200 रुपयाची नोट छापण्याचे आदेश दिले असून यानंतर सरकारी मुद्रणालयात नोट छापण्याच्या कामाला सुरुवातदेखील झाली आहे. जुलैपर्यंत या नोटा चलनात आणण्याचे सरकारचे उद्दीष्ट होते. पण आता या नोटा चलनात आणण्यासाठी आणखी वेळ लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.