आता ८४ औषधे मिळणार स्वस्तात; किमतीमध्ये बदल, सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 10:11 AM2022-07-06T10:11:27+5:302022-07-06T10:12:06+5:30
कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यासाठी सूचित केलेल्या फॉर्म्युलेशनच्या किमतीही निश्चित केल्या आहेत.
नवी दिल्ली : सध्या उपचाराचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून, केमिस्ट अधिक किमतीने औषधे विकत असल्याचेही समोर आले आहे. यावर अंकुश लावण्यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) ८४ औषषांच्या किमती निश्चित केली आहे. यामुळे कोणताही औषध विक्रेता अधिक किमतीने औषधे विकू शकणार नाही. यामुळे मधुमेह, डोकेदुखी, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यासाठी सूचित केलेल्या फॉर्म्युलेशनच्या किमतीही निश्चित केल्या आहेत. औषध (किंमत नियंत्रण) आदेश, २०१३ च्या अधिकारांचा वापर करून, एनपीपीएने औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत, असे नियामकाने एका अधिसूचनेत म्हटले आहे.
तापाच्या गोळ्यांचीही ‘ताप’ झाला कमी
पॅरॉसिटोमॉल कॅफीन टॅब्लेट २.८८ रुपये, रोसुवास्टानिन ॲस्पिरीन अँड क्लोपिडोग्रेल कॅप्सुल १३.९१ रुपये आणि वोग्लिबोस अँड मेटफोर्मिन हायड्रोक्लाराइड गोळी १०.४७ रुपयांनी मिळणार आहे.एनपीपीएने नुकतीच औषधांच्या किमतीमध्ये सुमारे १०.७६ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे पॅरासिटेमोल, ॲन्टीरेबीज, अमॉक्सीसिलीन यासारखी प्रतिजैविके, कॅल्शियम, जीवनसत्त्वे (व्हिटॅमीन) इत्यादी आवश्यक ८००हून अधिक औषधांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याची झळ वैद्यकीय क्षेत्रासह सामान्य लाेकांनाही बसत आहे.
काय म्हटले अधिसूचनेत?
एनपीपीएने औषध कंपन्यांना निश्चित केलेल्या किमतींचे कठोरपणे पालक करण्याचे आदेश दिले आहेत. असे न केल्यास त्यांनी वसूल केलेल्या अतिरिक्त रकमेवर व्याजासह दंड भरावा लागणार आहे. किमतीमध्ये बदल झाल्यानंतर जीएसटी हा वेगळा असेल. मात्र त्यासाठी वेगळे नियम आहेत. जर कोणताही विक्रेता या औषधांसाठी अधिक किंमत घेत असेल तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.