आता ‘एआय’ करणार वाहतूक नियंत्रण; बंगळुरूमध्ये चाैकाचाैकांत लागणार नवे तंत्रज्ञान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 06:11 AM2024-09-14T06:11:45+5:302024-09-14T06:12:10+5:30
व्हीडिओद्वारे एआय तंत्रज्ञान अपघात तसेच विरुद्ध दिशेने येणारी वाहने तसेच वाहतुकीतील अडथळे ओळखून वाहतूक नियंत्रित करते.
बंगळुरू - वाहतूककाेंडीच्या बाबतीत बंगळुरू हे शहर कुख्यात झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी कायम वाहतूककाेंडी असते. मात्र, आता शहरातील वाहतूक व्यवस्थानामध्ये एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.
शहरातील प्रमुख चाैकांवर एआय तंत्रज्ञानावर आधारित ‘ॲडाप्टिव्ह ट्रॅफिक कंट्राेल सिस्टिम’वर चालणारे सिग्नल्स बसविण्यात येणार आहेत. वाहतूककाेंडी रोखण्यासाठी जास्तीतजास्त स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचा वापर करण्याच्या याेजनेचा हा भाग आहे. डिसेंबरपर्यंत १६५ चाैकांमध्ये पूर्णपणे एआय तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसविली जाईल.
९०० चाैक विना सिग्नलचे
बंगळुरूमध्ये ९०० चाैक विना वाहतूक सिग्नलचे आहेत. तर, ४०५ चाैकांवर सिग्नल आहेत. वाहतूक विभागाने सध्या शहरातील महत्त्वाचे ४१ चाैक निवडले असून, त्यापैकी ७ सिग्नलवर एआय यंत्रणा बसविण्यात आली आहे. तर, ३४ सिग्नल्स जुन्या कॅमेऱ्यावर आधारित यंत्रणेपासून अपडेट करण्यात आले आहेत.
या देशांमध्ये हाेताे वापर
जर्मनी, नेदरलॅंड, स्वित्झर्लंड, अमेरिका आदी देशांमध्ये काही प्रमुख शहरांमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ‘एआय’ची मदत घेतली जात आहे. तेथे व्हीडिओद्वारे एआय तंत्रज्ञान अपघात तसेच विरुद्ध दिशेने येणारी वाहने तसेच वाहतुकीतील अडथळे ओळखून वाहतूक नियंत्रित करते.
कसे होईल नियंत्रण?
नवी यंत्रणा तीन टप्प्यांत काम करेल. मानवचलित : या यंत्रणेत पाेलिसांना एआय यंत्रणेला टाळून रुग्णवाहिका किंवा व्हीआयपींसाठी सिग्नल नियंत्रित करता येतील. वाहनांच्या संख्येनुसार ‘व्हीएसी’ माेड : सिग्नलवर बसविलेल्या कॅमेऱ्यांद्वारे वाहनांच्या संख्येचा अंदाज घेऊन रिअल टाइम सिग्नलच्या वेळा नियंत्रित करणे. एआय नियंत्रित माेड : विविध चाैकांमधील सिग्नलचा एकाच वेळी आढावा व वाहतुकीचा अंदाज घेऊन सिग्नलचे एकाच वेळी नियंत्रण.