आता बेनामी मालमत्ता, सोने खरेदी रडारवर!
By admin | Published: November 14, 2016 05:52 AM2016-11-14T05:52:55+5:302016-11-14T05:52:55+5:30
गेले चार दिवस देशभर बँका व एटीएमबाहेर पैसे बदलून घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहेत. सरकारला याची जाणीव आहे. देशवासीयांनी केवळ ५० दिवस कळ सोसावी.
पणजी/बेळगाव : गेले चार दिवस देशभर बँका व एटीएमबाहेर पैसे बदलून घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहेत. सरकारला याची जाणीव आहे. देशवासीयांनी केवळ ५० दिवस कळ सोसावी. पन्नास दिवसांची स्वच्छता मोहीम पार पडल्यानंतर उंदीरदेखील दिसणार नाही, असे सांगत पुढील टप्प्यात बेहिशेबी मालमत्ता आणि विनापावती सोने खरेदीवरही टाच आणली जाईल, असे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
रविवारी ताळगाव-पणजी येथे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आपण आणखीही कठोर पावले उचलणार, असे सांगून मोदी म्हणाले, काळ्या पैशांविरुद्ध आम्ही युद्ध लढत आहोत. ३० डिसेंबरनंतरही हे युद्ध संपणार नाही. मी माझ्या निर्णयांबाबत देशाला अंधारात ठेवले नव्हते.
विदेशातील काळ्या पैशांविरुद्ध पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत एसआयटी नेमली होती. त्या वेळीच माझे इरादे स्पष्ट झाले होते. जन-धन योजनेद्वारे सर्वांची
बँक खाती उघडण्यामागेही काळ्या पैशांविरुद्ध पाऊल उचलणे, हाच हेतू होता. अनेक धनिक काळ्या पैशांद्वारे बेनामी मालमत्ता खरेदी करतात. त्यांचीही गय केली जाणार नाही. बिल्डरांचा दोष नाही. मालमत्ता विकणे हे त्यांचे कामच आहे; पण बेनामी मालमत्ता सरकार ताब्यात घेईल, कारण ती देशाची मालमत्ता आहे.
...तर मतदारसंघात जाणे मुश्किल
दोन लाख रुपयांपेक्षा जास्त सोने विक्री करण्यासाठी पॅनकार्डची सक्ती केल्यानंतर अर्ध्यापेक्षा अधिक संसद सदस्यांनी माझ्याशी संपर्क करून यातून सूट देण्याची मागणी केली होती. ज्या लोकांनी कधी आपल्या विधवा आईकडे लक्ष दिले नाही ते लोक आज त्या आईच्या खात्यात अडीच लाख रुपये जमा करीत आहेत. ज्या दिवशी मी अशी नावे जाहीर करील त्या दिवशी त्यांना आपल्या मतदारसंघात जाणे मुश्किल होईल, असा गर्भित इशाराही मोदी यांनी दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)