आता पासपोर्ट बनवणे झाले खूपच सोपे, पीसीसी मिळणार ऑनलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 06:12 PM2022-09-27T18:12:15+5:302022-09-27T18:12:39+5:30
Passport : परराष्ट्र मंत्रालयाचा (MEA) हा निर्णय पासपोर्ट अर्जदारांसाठी (Passport Applicants) निश्चितच दिलासा देणारी बातमी आहे.
नवी दिल्ली : जर तुम्ही पासपोर्ट (Passport) बनवणार असाल आणि त्याच्या पडताळणी प्रक्रियेबद्दल (Verification Process) काळजी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दरम्यान, आता पासपोर्ट मिळवणे आणखी सोपे झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) दिलेल्या माहितीनुसार, पासपोर्ट अर्जदार पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी (PCC) पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
परराष्ट्र मंत्रालयाचा (MEA) हा निर्णय पासपोर्ट अर्जदारांसाठी (Passport Applicants) निश्चितच दिलासा देणारी बातमी आहे. आता या कामासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, ही सुविधा 28 सप्टेंबरपासून म्हणजेच बुधवारपासून सुरू होणार आहे. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी (PCC) अर्जदार सर्व पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रावर (POPSK) ऑनलाइन अर्ज करू शकतात. दरम्यान, पासपोर्ट जारी करण्याच्या प्रक्रियेत, पोलीस पडताळणीचे काम सर्वात जास्त वेळ घेणारे आहे.
पासपोर्ट जारी करण्यासाठी नोडल मंत्रालय असलेल्या परराष्ट्र मंत्रालयाने अर्जदारांना भेडसावणाऱ्या समस्येचे बऱ्याच अंशी निराकरण केले आहे. पोलीस पडताळणीमध्ये स्थानिक पोलिसांमार्फत पडताळणी केली जाते, त्यानंतर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट दिले जाते. गेल्या काही दिवसांपासून पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटच्या मागणीत जोरदार वाढ होत असल्याने परराष्ट्र मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.
या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटची मागणी वाढल्यामुळे देशातील सर्व पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या सुविधेशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 28 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यासह, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी आगाऊ अपॉइंटमेंट देखील घेतली जाऊ शकते.
पासपोर्ट अर्जदारांना मोठा दिलासा
पासपोर्ट अर्जदारांसाठी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आवश्यक आहे. दरम्यान, निवासी स्थिती, रोजगार किंवा दीर्घकालीन व्हिसा आणि इमिग्रेशनसाठी अर्ज करताना हे आवश्यक आहे, तर हे सर्टिफिकेट पर्यटक व्हिसावर परदेशात जाणाऱ्या लोकांना दिले जात नाही. परराष्ट्र मंत्रालयाच्या या निर्णयामुळे पासपोर्ट अर्जदारांना दिलासा मिळणार असून लांबलचक प्रक्रियेतून सुटका होणार आहे. याचा फायदा केवळ परदेशात नोकरीच्या आशेने असलेल्या भारतीय नागरिकांना होणार नाही तर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटच्या इतर मागण्या पूर्ण करण्यातही मदत होईल.