लय भारी! आता रेल्वे रुळावरून धावणार सायकल, अशी आहेत वैशिष्ट्ये, एवढी आहे किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 04:06 PM2020-08-03T16:06:52+5:302020-08-03T16:27:05+5:30
रेल्वे रुळावरून सायकलही धावू शकते याचा विचार तुम्ही कधी केलाय का? पण भारतीय रेल्वेने ही कमाल करून दाखवली आहे.
नवी दिल्ली - रेल्वे ट्रॅकवरून रेल्वे गाड्या आणि मालगाड्या धावतात. पण काही ठिकाणी दुरस्तीचे काम सुरू असताना विशिष्ट्य प्रकराच्या क्रेन, इतर मशिनरी आणि काही वैशिष्ट्यपूर्ण फेरबदल केलेले ट्रक आणि डंपर रेल्वे रुळावरून धावताना तुम्ही पाहिले असतील. मात्र रेल्वे रुळावरून सायकलही धावू शकते याचा विचार तुम्ही कधी केलाय का? पण भारतीय रेल्वेने ही कमाल करून दाखवली आहे. भारतीय रेल्वेने एक अशी सायकल विकसित केली आहे जी रेल्वे रुळावरून धावण्यास सक्षम आहे.
उत्तर पश्चिम रेल्वेच्या अजमेर विभागातील सीनियर डिव्हिजनल इंजिनियर पंकज सोईन यांच्या कल्पक डोक्यातून या सायकलची कल्पना पुढे आली. त्यानंतर ही सायकल विकसित करण्यात आली. या सायकलचं वजन केवळ २० किलो असून, ती तयार करण्यासाठी अवघे ५ हजार रुपये खर्च झाले आहेत. ही सायकल आरामात उचलूने नेता येऊ शकते.
दरम्यान, ही सायकल रेल्वे रुळावरून धावणार असली तरी ती सर्वसामान्यांना उपलब्ध होणार नाही. तर तिचा वापर हा रेल्वे मार्गाचे निरीक्षण आमि ट्रॅकच्या दुरुस्तीच्या कामात केला जाणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या सायकलचा एक व्हिडिओ शेअर करून या संदर्भातील माहिती दिली आहे.
Railways introduces Rail Bicycle - a novel mechanism to quickly travel on rail tracks for inspections, monitoring & urgent repairs.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) July 29, 2020
Simple innovation ensuring passenger security! pic.twitter.com/H2JaqJUBtA
या सायकलच्या पुढील चाकाला एक पाइप लावलेला आहे. त्याला एक छोटे चाक जोडलेले आहे, हे चाक रुळाच्या एका बाजूने चालते. ही सायकल बनवण्यासाठी रेल्वे कार्टची दोन जुनी चाके आणि दोन लोखंडी पाइपांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या सायकलवरून पडण्याचा धोका राहणार नाही. मैलोनमैल चालून रेल्वेमार्गांची देखभार करणारे रेल्वेचे गँगमन आणि ट्रॅकमन यांना कामासाठी या सायकलचा उपयोग होणार आहे.