आता भाजपातही पुढील आठवड्यात बदल!
By admin | Published: July 9, 2016 02:43 AM2016-07-09T02:43:21+5:302016-07-09T02:43:21+5:30
केंद्र सरकारचा चेहरामोहरा बदलल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीतही पुढील आठवड्यात फेरबदल होणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह हे या बदलांवर शेवटचा हात फिरवत
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
केंद्र सरकारचा चेहरामोहरा बदलल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीतही पुढील आठवड्यात फेरबदल होणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह हे या बदलांवर शेवटचा हात फिरवत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परत येताच नवी संघटनात्मक टीम जाहीर केली जाईल.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता पक्षात बदल होतील. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, उत्तर पूर्व राज्ये, कर्नाटक, गुजरात व आणखी दोन राज्यांना शाह यांच्या या नव्या रचनेत स्थान मिळेल. सतीश उपाध्याय यांच्याकडे दिल्ली भाजपाच्या प्रमुखपदाची जबाबदारी नेहमीच तात्पुरत्या स्वरूपात राहत आली आहे. आता तेथे नवे नेतृत्व दिले जाईल. बिहार भाजपाचे नेते सुशील मोदी यांना येथे संघटनात्मक कामासाठी आणले जाईल, असे समजते. महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि युवा मोर्चाचे प्रमुख अनुराग ठाकूर यांनाही आपली पदे बहुधा सोडावी लागतील. रहाटकर या महाराष्ट्र महिला आयोगाच्या प्रमुख बनल्या. ठाकूर सरचिटणीस म्हणून काम करतील. सध्या ठाकूर भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आहेत. खासदार पूनम महाजन यांना एकतर महिला मोर्चाचे प्रमुख किंवा युवा मोर्चाची जबाबदारी दिली जाईल. सध्या पूनम महाजन पक्षाच्या सरचिटणीस आहेत.
अमित शाह देणार आणखी एक धक्का
- अमित शाह आता पक्ष संघटनेतील बदलाने आणखी एक धक्का देतील. १९ कनिष्ठ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला ती प्रारंभी एक निरस घटना वाटली तरी प्रत्यक्षात जमीन हादरवणारी होती. येत्या दोन वर्षांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला तोंड देण्यासाठी शाह यांच्याकडे त्यांचा संघ असेल. तो संघ तुलनेने तरुण आणि अधिक जबाबदारीचाही असेल.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुरेश सोनी यांना भाजपाशी समन्वय राखण्यासाठी संघाचे संयुक्त सरचिटणीस कृष्ण गोपाल यांच्या जागी नेमले असून, त्यांचा बहुधा वापर होईल, अशी चर्चा आहे.