आता न्या. के. एम. जोसेफ यांच्या ज्येष्ठतेवरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 05:00 AM2018-08-07T05:00:22+5:302018-08-07T05:00:29+5:30
उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. के. एम. जोसेफ यांच्या सर्वोच्च न्यायालयावरील नेमणुकीवरून न्यायसंस्था आणि सरकार यांच्यात सुमारे सहा महिने झालेला संघर्ष संपला असे वाटत असतानाच आता न्या. जोसेफ यांच्या ज्येष्ठतेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नवी दिल्ली : उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. के. एम. जोसेफ यांच्या सर्वोच्च न्यायालयावरील नेमणुकीवरून न्यायसंस्था आणि सरकार यांच्यात सुमारे सहा महिने झालेला संघर्ष संपला असे वाटत असतानाच आता न्या. जोसेफ यांच्या ज्येष्ठतेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
न्या. जोसेफ यांच्यासह न्या. इंदिरा बॅनर्जी व न्या. विनीत सरन या तिघांचा शपथविधी उद्या मंगळवारी आहे. मात्र याचा क्रम ठरविताना केंद्र सरकारने न्या. जोसेफ यांचा क्रम न्या.बॅनर्जी व न्या. सरन यांच्यानंतर तिसरा लावल्याने वाद निर्माण झाला आहे. यामुळे न्या. जोसेफ ज्येष्ठतेमध्ये खाली जाणार आहेत.
न्या. मदन लोकूर व न्या. कुरियन जोसेफ यांच्यासह अन्य काही न्यायाधीशांनी सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांना भेटून न्या. जोसेफ यांची ज्येष्ठता डावलली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
>ज्येष्ठता अशी ठरते
‘कॉलेजियम’ त्यांच्या ठरावांमध्ये नेमल्या जायच्या न्यायाधीशांच्या ज्येष्ठतेचा उल्लेख करत नाही. न्यायाधीश नेमणुकांसंबंधी जी ‘मेमोरेंडम आॅफ प्रोसिजर’ ठरली आहे, त्यातही ज्येष्ठतेविषयी नियम नाही. त्यामुळे न्यायाधीश ज्या दिवशी शपथ घेतात, त्यानुसार ज्येष्ठता मानण्याचा प्रघात आहे.
एकाच दिवशी एकाहून जास्त न्यायाधीशांचा शपथविधी झाला, तर ज्येष्ठता शपथविधीच्या क्रमानुसार ठरते.