मोदींवरील पुस्तकावर आता बंदीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2016 02:22 AM2016-06-26T02:22:46+5:302016-06-26T02:22:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांपैकी अपूर्ण आश्वासनांवर गुजराती भाषेत एक पुस्तक प्रकाशित झाले असून, मोदी यांचे समर्थक
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांपैकी अपूर्ण आश्वासनांवर गुजराती भाषेत एक पुस्तक प्रकाशित झाले असून, मोदी यांचे समर्थक नरसिंहभाई सोळंकी यांनी या पुस्तकावर बंदीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
पुस्तकाला विरोध करणाऱ्या सोळंकी यांनी या प्रकरणी मोदी यांनाही पक्षकार बनविले आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पालडी येथील रहिवासी जे.आर. शाह यांनी ‘फेकूजी हवे दिल्लीमा’ (फेकूजी आता दिल्लीत आहे) या शीर्षकाखाली एक पुस्तक लिहिले आणि स्वत:ची कंपनी असलेल्या जे.आर. एंटरप्राईजेसतर्फे ते प्रकाशित केले. हे पुस्तक मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांवर लिहिले आहे. परंतु सामाजिक कार्यकर्ता असल्याचा दावा करणारे बहरामपुरा येथील रहिवासी सोळंकी यांच्या मते या पुस्तकाचे शीर्षक आणि त्यातील मजकूर आक्षेपार्ह आहे. त्यांनी गुरुवारी शहरातील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करून या पुस्तकाचे प्रकाशन आणि विक्रीवर त्वरित बंदी आणण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. (वृत्तसंस्था)
काय आहे आक्षेप?
सोळंकी यांचे वकील एम.एस. भावसार यांनी सांगितले की, पुस्तक मोदींच्या अपूर्ण आश्वासनांवर असून मोदी सरकार सत्तेत येऊन फक्त दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.
ही आश्वासने पूर्ण करण्यास सरकारकडे भरपूर कालावधी आहे; शिवाय या पुस्तकाचे शीर्षकही आक्षेपार्ह आणि मोदी समर्थकांच्या भावना दुखावणारे आहे. त्यामुळे बंदीची मागणी करण्यात आली आहे.