आता कोरोना रुग्णांवर प्रत्येक पाऊलावर नजर ठेवणार हे यंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 03:05 AM2020-06-13T03:05:13+5:302020-06-13T03:05:35+5:30
जाणून घ्या खासियत : वाराणसीतील विद्यार्थ्यांनी तयार केले यंत्र
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या माहामारीत संक्रमण झालेल्या लोकांकडे लक्ष ठेवणं खूपच कठीण झालं आहे. कारण, दिवसेंदिवस संक्रमणाचा आकडा वाढत आहे. त्यासाठी अनेक अॅप्स सुद्धा तयार करण्यात आले होते. वाराणसीतील अशोका इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी एक यंत्र तयार केलं आहे. अशोका इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळासाठी हे यंत्र तयार केलं आहे. या यंत्राने कोरोनाचे हॉटस्पॉट असलेली घरं, रुग्णालयं किंवा क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर आलेल्या लोकांची माहिती पोलिसांना गजर वाजल्यामुळे मिळू शकेल.
स्मार्ट गार्ड फॉर कोविड-19 नावाच्या या यंत्राच्या माध्यामातून रुग्णालयात भरती असलेल्या किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये राहत असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवता येऊ शकतं. रिसर्च अँड डेव्हल्पमेंट डिपार्टमेंटचे श्याम चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय पांडे, निखिल केसरी
आणि मोहम्मद सैफ यांनी हे यंत्र तयार केले आहे.
बारकाईने लक्ष ठेवण्यास मदत होईल
संक्रमित रुग्णांच्या निष्काळजीपणामुळे अनेकदा संक्रमण पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे या यंत्राने रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास मदत होईल. यामुळे रुग्ण घराबाहेर कितीवेळा निघाला आहे याबाबत माहिती मिळू शकेल. रुग्णांच्या हालचालींवरून सेंन्सर कार्यान्वित होईल त्यानंतर पोलीसांपर्यंत रुग्णाचे लोकेशन पोहोचवले जाईल. या यंत्राला रुग्णालयाजवळ किंवा घराजवळ लावण्यात येणार आहे. या सेंन्सरची रेंज ५ चे १० मीटरपर्यंत असेल.