आता सपा नेत्याच्या वक्तव्यावरून वाद
By Admin | Published: October 24, 2015 02:57 AM2015-10-24T02:57:56+5:302015-10-24T02:57:56+5:30
उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला. मोबाईल फोनमुळेच देशातील विविध भागांत मुलींवर बलात्कार होत
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला. मोबाईल फोनमुळेच देशातील विविध भागांत मुलींवर बलात्कार होत आहेत, असे ते म्हणाले.
अलीकडे दिल्लीत अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार होतो. का? याचे कारण मोबाईल फोन आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलवर अश्लील मजकूर सहज पाहायला मिळतो. लहान लहान मुले नाही ते डाऊनलोड करून बघताना आढळतात. खेडोपाडी जाऊन पाहिले असता अल्पवयीन मुले अश्लील व्हिडिओ पाहताना दिसतात. हे अश्लील व्हिडिओ पाहूनच बलात्कारासारख्या घटना घडतात. अल्पवयीन मुली वासनांधाची
शिकार ठरतात, असे आझम खान म्हणाले.
तत्पूर्वी आझम खान यांनी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांच्या कुत्र्याची उपमा दिल्याबाबतच्या विधानावर सडकून टीका केली. सिंग जे काही बोलले त्यात काहीही आश्चर्य नाही. कारण ही भाजपाची संस्कृतीच आहे, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली. व्ही.के. सिंग यांच्या वक्तव्याची तुलना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१३ मध्ये दिलेल्या एका वक्तव्याशी केली. नरेंद्र मोदी यांनी पिल्लू शब्द वापरला होता. आता याच पिल्लाचे कुत्रे झाले, असे आझम खान म्हणाले. भाजपाने मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर एका मुलाखतीत मोदींना गुजरात दंगलीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. गुजरात दंगलीबाबत वाईट वाटते का? असे त्यांना विचारण्यात आले होते. यावर एखादे कुत्र्याचे पिल्लू गाडीच्या चाकाखाली येऊन मरते तेव्हाही दु:ख होते, या दंगलीत तर माणसे मेली होती, असे उत्तर मोदींनी दिले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)