आता नदी, ओढ्याच्या पाण्यातून वीजनिर्मिती; संशोधकांना जलविद्युत टर्बाइनचे पेटंट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 08:14 AM2024-09-13T08:14:17+5:302024-09-13T08:14:35+5:30
छोट्या व लघू स्तरीय जलविद्युत प्रकल्पांमध्ये क्रांती घडवून आणण्यास मदत होणार आहे.
गुवाहाटी : आसामच्या दिब्रुगड विद्यापीठ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेच्या (डीयूआयईटी) दोन संशोधकांना जलविद्युत टर्बाइनचे पेटंट मिळाले आहे. ओढे व नद्यांसारख्या उथळ पाण्याच्या स्रोतांपासून वीज निर्मितीसाठी या संशोधकांनी निर्माण केलेल्या जलविद्युत टर्बाइनसाठी हे पेटंट मिळाल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने दिली.
विद्यापीठातील अभियांत्रिकी विभागातील संशोधक प्रांजल सरमाह व सिद्धार्थ शंकर सरमाह यांनी केलेल्या उल्लेखनीय संशोधनाची पेटंटसाठी निवड झाली आहे. यामुळे जलविद्युत निर्मितीसाठीचा खर्च वाचणार आहे.
धरणांची गरज नाही
‘उथळ पाण्याच्या प्रवाहात वीज निर्मितीसाठी टर्बाइन डिव्हाइस व त्यापासून अक्षय ऊर्जेची निर्मिती’ असे या उपकरणाचे शीर्षक आहे. छोट्या व लघू स्तरीय जलविद्युत प्रकल्पांमध्ये क्रांती घडवून आणण्यास मदत होणार आहे. पारंपरिक जलविद्युत निर्मितीसाठी धरणांची गरज भासते. मात्र, या संशोधनामुळे जलविद्युत निर्मितीसाठीचा खर्च वाचणार आहे. कसित केलेल्या टर्बाइनसाठी धरणाची किंवा जलसाठ्याची आवश्यकता लागणार नाही, अशी माहिती संशोधक प्रांजल सरमाह यांनी दिली आहे.