केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता सरकारी सहल
By Admin | Published: December 7, 2015 01:42 AM2015-12-07T01:42:22+5:302015-12-07T01:42:22+5:30
लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारी खर्चाने आनंद लुटण्याची अपूर्व संधी लाभणार आहे. जंगलातील राहुट्यांमधील वास्तव्य, गुलमर्गच्या हिमाच्छादित पर्वतराजींमध्ये स्कीर्इंगचा आनंद लुटणे
नवी दिल्ली : लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारी खर्चाने आनंद लुटण्याची अपूर्व संधी लाभणार आहे. जंगलातील राहुट्यांमधील वास्तव्य, गुलमर्गच्या हिमाच्छादित पर्वतराजींमध्ये स्कीर्इंगचा आनंद लुटणे असो अथवा गिर्यारोहणासारख्या अचाट साहसी प्रयोगांचा अनुभव घेताना त्यांना स्वत:चा खिसा शाबूत राखता येईल.
कर्मचाऱ्यांना चमू म्हणून काम करताना जोखीम पत्करणे शिकावे यासाठी मोदी सरकारने कार्यालयाबाहेरचा अनुभव देण्याची योजना आखली आहे. सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना साहसी क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होता येईल. सततच्या बैठ्या कामांमुळे येणारी निष्क्रियता किंवा धोक्याची घंटा वाजवणारी स्थिती टाळण्यासाठी सरकारने या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जोखीम पत्करण्यासह चमू म्हणून सांघिकतेची भावना वृद्धिंगत व्हावी, सदैव तत्पर राहण्याची क्षमता वाढावी, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रतिसाद क्षमता वाढविण्याचा त्यामागे उद्देश असेल, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) स्पष्ट केले.
मनालीची अटलबिहारी वाजपेयी गिर्यारोहण आणि संलग्न क्रीडा संस्था, गुलमर्गची स्कीर्इंग आणि गिर्यारोहण संस्था, गोव्याची वॉस्को द गामा जलक्रीडा संस्था, नेहरू गिर्यारोहण संस्था उत्तरकाशी आदी संस्थांवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पॅरासेलिंग, बलूनिंग, पॅराग्लायडिंग, जंगल सफारी, वाळवंटातील सफारी, बीच ट्रेकिंग तसेच पर्यावरणासंबंधी जागृती शिबिरांमध्ये कर्मचाऱ्यांना सहभागी होता येईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यासाठी खास सुटी मंजूर केली जाणार असून २० हजार रुपयांपर्यंत खर्च सरकारकडून दिला जाईल.
प्रत्येक मंत्रालय आणि विभागातील दोन अधिकाऱ्यांना सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल अशा कार्यक्रमांचे शंभर टक्के शुल्क सरकारकडून बक्षीस म्हणून दिले जाईल. त्यांची अशा कार्यक्रमांसाठी खास नियुक्ती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.