अब मेरे पास भाई नहीं है । - अमिताभ बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 11:57 AM2017-12-05T11:57:06+5:302017-12-05T12:54:48+5:30
शशी कपूर यांच्या जाण्याने अमिताभ बच्चन यांना खूप मोठा धक्का बसला असून भावनिक झाले आहेत. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी आपलं मन मोकळं केलं आहे.
मुंबई - बॉलिवूडमधील एकेकाळची प्रसिद्ध जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि शशी कपूर. दिवार चित्रपटात सख्ख्या भावांची भूमिका निभावणारे हे दोघे दिग्गज अभिनेते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं. पण दिवारमधील त्यांची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. दोघांमधील जुगलबंदी प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतली होती. शशी कपूर यांच्या जाण्याने अमिताभ बच्चन यांना खूप मोठा धक्का बसला असून भावनिक झाले आहेत. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी आपलं मन मोकळं केलं आहे. अमिताभ यांनी रुमी जाफरी यांच्या एका शेरपासून आपल्या ब्लॉगची सुरुवात केली आहे.
'हम ज़िंदगी को अपनी कहां तक सम्भालते
इस क़ीमती किताब का काग़ज़ ख़राब था'
अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला असून त्याला कॅप्शन दिली आहे की, 'आपके बबुआ की तरफ से शशि जी'. शशी कपूर प्रेमाने अमिताभ बच्चन यांनी 'बबुआ' म्हणत असत.
T 2731 - To Shashji from your 'babbua' .. !! https://t.co/MFYeeR1Sbbpic.twitter.com/rfzDdDtiBk
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 4, 2017
ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. आपण कशाप्रकारे शशी कपूर यांच्यापासून प्रभावित होतो, त्यांची हेअरस्टाईल, वागणं कसं कॉपी करायचो हे अमिताभ यांनी सांगितलं आहे. शशी कपूर यांचे कुरळे केस ज्याप्रकारे त्यांचं कपाळ आणि कानावर परसरलेल असायचे ते आपल्याला प्रचंड आवडायचं.
पत्नी जेनिफर यांच्या मृत्यूनंतर शशी कपूर कशाप्रकारे एकटे पडले होते याबद्दलही अमिताभ बच्चन बोलले आहेत. आजारांशी लढणा-या शशी कपूर यांच्याकडे पाहून आपण खूप काही शिकलो असल्याचं अमिताभ बोलतात. 75 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी सांगितलं आहे की, कशाप्रकारे प्रत्येक भेटीत शशी कपूर आणि आपली मैत्री घट्ट होत गेली.
अमिताभ यांनी लिहिलं आहे की, जेव्हा त्यांना आपल्या प्रिय मित्राच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा ते रुग्णालयात गेले नाहीत. मी फक्त एकदा रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, त्यानंतर कधीच गेलो नाही. 'मी कधीच गेलो नाही. माझ्या प्रिय मित्राला रुग्णालयात अशाप्रकारे पडून राहिलेलं पाहण्याची माझी इच्छा नव्हती, आणि जेव्हा त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी मला मिळाली, तेव्हादेखील मी रुग्णालयात गेलो नाही'. अंत्यदर्शनासाठी अमिताभ बच्चन आपला मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या रायसोबत त्यांच्या घरी गेले होते.
अमिताभ पुढे लिहितात की, 'शशी कपूर यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर काही वेळाने लेखक रुमी जाफरी यांनी मला हा शेर पाठवला, जो वरती लिहिला आहे'. 'शशी कपूर मला नेहमी बबुआ म्हणायचे...आज माझ्यासोबत त्यांच्या आयुष्यातील अनेक पाने कोरीच राहिली', असं अमिताभ यांनी सांगितलं आहे.
अमिताभ यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितलं की, 'जेव्हा मी 60 च्या दशकात चित्रपटसृष्टीत संघर्ष करत होतो, तेव्हा शशी कपूर यांचा फोटो पहिल्यांदा पाहिला होता. मॅगजीनमध्ये छापण्यात आलेल्या त्यांच्या फोटोसोबत लिहिलं होतं की, राज कपूर आणि शम्मी कपूर यांचा छोटा भाऊ लवकरच पदापर्ण करणार आहे'. हे वाचल्यानंतर अभिनेता बनण्याची इच्छा असणारे अमिताभ विचार करु लागले की, जर असे लोक जवळपास असतील, तर मग आपला काहीच चान्स नाही.
शशी कपूर यांनी एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. आज मेरे पास मां है ! हा त्यांचा सुपरहिट डायलॉग. हा फक्त एक डायलॉग नसून चित्रपटसृष्टीच्या इतिहासाच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार आहे. आज मेरे पास मां है ! म्हणणारे शशी कपूर आज आपल्यात नसल्याने अनेकजण शोक व्यक्त करत आहेत. आपल्या भावासारखा मित्र गमावणारे अमिताभ म्हणतायत, अब मेरे पास भाई नहीं है।