आता भारतालाही भूकंपाचा धोका; तुर्की आणि सीरियासंदर्भात आधीच इशारा देणाऱ्या डच संशोधकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 06:31 AM2023-02-11T06:31:47+5:302023-02-11T06:33:07+5:30
काँक्रीट आणि पॉलिमर फायबरसह केलेले बांधकाम यामुळे भारतातील इमारती भूकंप प्रतिरोधक आहेत. त्यामुळे भूकंपातून वाचण्याची शक्यता अधिक असते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
ॲमस्टरडॅम : तुर्की आणि सीरियाला भूकंपाचा धक्का बसेल असा अंदाज वर्तविणारे डच संशोधक फ्रँक हॉगरबीटस यांनी स्पष्ट केले आहे की, भारतालाहीभूकंपाचा धोका आहे. याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात फ्रँक हॉगरबीटस म्हणतात की, अफगाणिस्तानात मोठा भूकंप होईल आणि त्याचे धक्के पाकिस्तान आणि भारतातही बसतील. एका ट्विटर यूजर्सने फ्रँक यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये होगरबीटस असे म्हणत आहेत की, वातावरणातील चढउतार पाहिल्यास अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या देशात भूकंपाचे धक्के बसू शकतात. परंतु, हे लक्षात ठेवा की, हे अंदाज आहेत. विशेष म्हणजे, या संशोधकांनी ३ फेब्रुवारी रोजी एका ट्विटमध्ये हा इशारा दिला होता की, तुर्की, जॉर्डन, सीरिया, लेबनॉन या देशांमध्ये ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप होईल.
तुर्की, सीरियात ६ रोजी
झालेल्या भूकंपानंतर त्यांच्या भविष्यवाणीचे ट्विट व्हायरल झाले होते. फ्रँक यांनी भूकंपानंतर आणखी धक्के बसतील असाही अंदाज वर्तविला होता. दरम्यान, तुर्कीत बांधकामाला परवानगी देताना आधुनिक बांधकाम नियम पाळण्यात आले नाहीत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
भारतातील इमारती भूकंप प्रतिरोधक
- काँक्रीट आणि पॉलिमर फायबरसह केलेले बांधकाम यामुळे भारतातील इमारती भूकंप प्रतिरोधक आहेत. त्यामुळे भूकंपातून वाचण्याची शक्यता अधिक असते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रोपर येथील संशोधकांनी नवीन आणि जुन्या इमारतीच्या बांधकामांची पाहणी केली आहे. बीम (आडवा खांब) आणि कॉलमचाही त्यांनी अभ्यास केला आहे.
भारतीय बेपत्ता
- उत्तराखंडमधील एक इंजिनिअर विजय कुमार (३६) हे तुर्कीत झालेल्या भूकंपानंतर बेपत्ता आहेत.
- ते एक महिन्याच्या ऑफिस टूरवर तुर्कीत गेलेले आहेत, असे त्यांचे भाऊ अरुण कुमार यांनी सांगितले.
- बेपत्ता विजय कुमार हे बंगळुरू स्थित एका कंपनीत काम करतात. ते २३ जानेवारी रोजी तुर्कीत पोहचले. त्यानंतर एकदा त्यांच्याशी बोललो असे अरुण यांनी सांगितले.