आता भारतीयांना मिळणार ई-पासपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 07:50 AM2022-01-07T07:50:21+5:302022-01-07T07:50:33+5:30
सध्या देशात पुस्तकाच्या स्वरुपामध्ये पासपोर्ट दिले जातात. प्रायोगिक तत्वावर सुमारे २० हजार ई-पासपोर्ट देण्यात आले आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मायक्रोप्रोसेसर चीप लावलेल्या असल्याने ते पूर्णत: सुरक्षित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच सर्व भारतीयांना ई-पासपोर्ट उपलब्ध करून देणार आहे. परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव संजय भट्टाचार्य यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. हे नवीन पासपोर्ट बायोमेट्रिकच्या वापरामुळे सुरक्षित असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय नागरिकांना ई-पासपोर्ट देण्याबाबत सरकार गंभीरपणे विचार करत असून, प्रक्रियेमध्ये जलदगती आणण्याची अपेक्षा त्यांनी केली.
या पासपोर्टला बायोमेट्रिक माहिती जोडलेली असल्याने ते सुरक्षित असल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले. या पासपोर्टमुळे परदेशामध्ये जाणाऱ्या नागरिकांना सुलभपणे प्रवास करणे शक्य होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या देशात पुस्तकाच्या स्वरुपामध्ये पासपोर्ट दिले जातात. प्रायोगिक तत्वावर सुमारे २० हजार ई-पासपोर्ट देण्यात आले आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मायक्रोप्रोसेसर चीप लावलेल्या असल्याने ते पूर्णत: सुरक्षित आहेत.