आता शत्रूंच्या रडारला भारताची युद्ध विमाने देणार चकवा!आयआयटीच्या संशोधकांनी तयार केले नवीन तंत्रज्ञान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:32 AM2023-02-10T10:32:15+5:302023-02-10T10:33:09+5:30
संशोधकांनी दावा केला की हा पदार्थ रडार फ्रिक्वेन्सी (सिग्नल) च्या मोठ्या रेंजला रोखण्यास सक्षम आहे. त्यांचा हा शोध सॅटेलाइट सर्व्हिस तंत्रज्ञानावर आधारित आहे, जेथे ९० टक्के रडार सिग्नल रोखू शकतो.
मंडी : चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रूंचा सामना करणाऱ्या भारतीय लष्कराला मदत करण्यात आयआयटी मंडीने मोठे यश मिळविले आहे. भारतीय लष्कराची युद्ध विमाने आणि इतर लष्करी उपकरणे शत्रूच्या रडारमध्ये दिसणार नाहीत, असे नवीन तंत्रज्ञान संशोधकांनी विकसित केले आहे. संशोधकांनी एक कृत्रिम पदार्थ तयार केला आहे ज्यामुळे लष्करी वाहने रडार सिग्नलमध्ये येणार नाहीत.
संशोधकांनी दावा केला की हा पदार्थ रडार फ्रिक्वेन्सी (सिग्नल) च्या मोठ्या रेंजला रोखण्यास सक्षम आहे. त्यांचा हा शोध सॅटेलाइट सर्व्हिस तंत्रज्ञानावर आधारित आहे, जेथे ९० टक्के रडार सिग्नल रोखू शकतो. या तंत्रज्ञानाद्वारे रडार सिग्नल कोणत्याही दिशेकडून गेले तरी भारतीय युद्ध विमाने त्यांच्यापासून लपून राहतील. लष्करी वाहने आणि गुप्त लष्करी तळाला संरक्षण देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करणेदेखील शक्य आहे.
शत्रूच्या रडारच्या नजरेत येणे हा लष्करी रणनीतीचा महत्त्वाचा भाग आहे. रडारपासून वाचल्याने शत्रूचे लक्ष्य होण्याचा धोका कमी होतो.
आयआयटी मंडीचे हे संशोधन आयईईई या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनाच्या लेखकांमध्ये स्कूल ऑफ कॉम्प्युटिंग अँड इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे सहायक प्राध्यापक डॉ. श्रीकांत रेड्डी यांच्यासह डॉ. अवनीश कुमार आणि ज्योती भूषण पाधी यांचा समावेश आहे.
हालचालीवर देखरेख
रडारचा वापर लष्करी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कार्यावर देखरेख आणि नेव्हिगेशनसाठी केला जातो. यावरून विमाने, जमिनीवरील वाहने आणि गुप्त तळांवर होत असलेल्या हालचाली उघड होतात. रडारद्वारे देखरेख करणे सोपे आहे.
रेडिएशनचा धोका कमी रडारपासून वाचण्यासाठी हे तंत्रज्ञान व्यावसायिक क्षेत्रातील इमारतींमधून रेडिएशनचा धोका कमी करण्यासाठी व त्यांची सुरक्षा वाढविण्यासाठीदेखील उपयुक्त ठरू शकते.