आता कारवाई करणे अधिक सोपे होईल, काश्मीरच्या डीजीपींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 02:23 PM2018-06-20T14:23:01+5:302018-06-20T14:23:01+5:30
जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग आणला आहे. आता राजकीय दबाव नसल्याने पोलीस आपली कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग आणला आहे. आता राजकीय दबाव नसल्याने पोलीस आपली कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील, तसेच येत्या काही दिवसांत दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग येईल, असा दावा जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी केला आहे.
राज्यपाल राजवटीमुळे कामावर काही फरक पडणार का असे विचारले असता वैद्य म्हणाले, राज्यात राज्यपाल राजवट लागू झाल्याने आम्हाला काम करणे अधिक सोपे होईल. दहशतवाद्यांविरोधातील आमचे अभियान सुरू राहील. रमजानच्या काळात कारवाईला अर्धविराम देण्यात आला होता. मात्र आता या कारवायांना अधिक वेग येईल, रमजानच्या काळात लागू करण्यात आलेल्या शस्त्रसंधीमुळे दहशतवाद्यांना फायदा झाला. या काळात आम्हाला केवळ आमच्या तळांवर होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची परवानगी होती. पण गोपनीय माहितीच्या आधारावर कारवाईस सुरुवात करण्याची परवानगी नव्हती. त्याचा दहशतवाद्यांना खूप लाभ झाला."
दरम्यान, लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यपाल राजवटीमुळे लष्कराच्या अभियानांवर काहीही फरक पडणार नसल्याचे तसेच काश्मीरमध्ये लष्करी मोहिमांना वेग आणण्यात येणार असल्याचे सांगितले.
We only stopped our operations during Ramzan. But, we saw what happened. The imposing of Governor's rule will not affect our operations. Our operations will go on like they used to. We don't face any political interference: General Bipin Rawat, Army chief pic.twitter.com/aOv0saHNE4
— ANI (@ANI) June 20, 2018