नमोवस्त्र... पंतप्रधान मोदींसाठी तयार होतंय पाइनच्या धाग्यांचं जॅकेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 10:29 AM2018-01-24T10:29:05+5:302018-01-24T10:56:19+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पोषाख हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मोदी यांच्या जॅकेटची स्टाईल आज तरुणाईमध्ये मोदी जॅकेट म्हणून लोकप्रिय आहे
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पोषाख हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मोदी यांच्या जॅकेटची स्टाईल आज तरुणाईमध्ये मोदी जॅकेट म्हणून लोकप्रिय आहे. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या जॅकेटवरुन चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास पाइनच्या झाडाचे जे धागे असतात त्यापासून जॅकेट बनवले जाणार आहे. केंद्रीय कपडा राज्य मंत्री अजय टम्टा स्वत: पंतप्रधानांना हे जॅकेट भेट म्हणून देणार आहेत.
या जॅकेटला नमोवस्त्र नाव देण्यात आल्याचे वृत्त आहे. वर्षभरापूवी आम्ही पाइनच्या झाडाच्या लाकडातून धागे काढण्यास सुरुवात केली. आता त्यापासून कापड बनवण्यात येणार आहे असे अजय टम्टा म्हणाले. यामुळे उत्तराखंडमध्ये कपडा उद्योग विकसित होऊ शकतो. भविष्यात इथल्या तरुणांना रोजगाराच्या शोधात दुस-या राज्यात जाण्याची गरज पडणार नाही असे उत्तराखंड सरकारमधील मंत्री सतपाल महाराज म्हणाले.
उत्तराखंडमध्ये सर्वाधिक भाग जंगलानी व्यापला असून या राज्यात 16 टक्के भागात पाइनचे जंगल आहे. पाइनच्या झाडाचा एक सणाशीही संबंध आहे. गडवालमध्ये पाइनच्या झाडाशी संबंधित पंडवा उत्सव साजरा केला जातो. पंतप्रधान मोदींनी हे जॅकेट परिधान केल्यानंतर आणखी मागणी वाढेल असा कयास आहे. मोदी जॅकेट आज ट्रेंडिगमध्ये आहे. जगातील अनेक नेते मोदी जॅकेटमध्ये दिसले होते. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे भारत दौ-यावर आले त्यावेळी त्यांनी मोदी जॅकेट परिधान केलेले होते.