आता नेताजींनीच पक्षाची धुरा सांभाळावी - शिवपाल यादव
By admin | Published: October 24, 2016 11:41 AM2016-10-24T11:41:42+5:302016-10-24T11:58:23+5:30
मुलायम सिंह यादव यांच्यामुळे समाजवादी पक्ष आज या उंचीवर पोहोचला असून त्यांनी पुन्हा पक्षाची धुरा सांभाळावी, असे शिवपाल यादव यांनी म्हटले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २४ - समाजवादी पक्ष मोठा करण्यासाठी मी नेताजींसोबत काम केले आहे, आता नेताजींनीच पक्षाची धुरा पुन्हा सांभाळावी, असे मत व्यक्त करत समाजावादी पक्षाच प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी अखिलेश यादव यांना पुन्हा विरोध दर्शवला आहे. समाजवादी पक्षात सुरू असलेला कौटुंबिक सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला असून या संघर्षाचे केंद्रबिंदू असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी काका शिवपाल यादव यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला. यावरूनच उत्तर प्रदेशातील वातावरण तापले असून हा गृहकलह अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर लखनऊमध्ये समाजवादी पक्षाच्या मुख्यालयातील बैठक आयोजित करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी अखिलेशविरोधातील नाराजी स्पष्टपणे दर्शवली.
' मुलायमसिंह यादव यांच्यामुळेच पक्ष आज या उंचीवर पोहोचला आहे, पक्षात बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही' अशा शब्दांत त्यांनी अखिलेशना फटकारले. ' तसेच अखिलेश यांनीच नवा पक्ष काढून निवडणूक लढवण्याची भाषा केली होती' असा आरोपही त्यांनी केला. तसेच ' पक्षात खोटारड्यांना बिलकूल जागा नाही' असे सांगत शिवपाल यांनी अखिलेश यांच्यावर टीका केली.
काय म्हणाले शिवपाल यादव :
१) समाजवादी पक्षाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेताजींसोबत काम केले आहे, खूप संघर्ष केला. गावागावात जाऊन आम्ही नेताजींची पत्र पोहोचवली, खूप मेहनत केली आम्ही.
२) नेताजीं आणि मुख्यमंत्र्यांच्या सर्व आदेशांचे मी पालन केले. कोणती आज्ञा आम्ही मानली नाही ते तुम्हीच सांगा.
३) माझ्याकडून सर्व विभाग काढून घेण्यात आले. सरकारमध्ये माझं काहीच योगदान नाही का?
४) मी नेताजींच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष बनलो होतो, पण माझ्याकडे पद आल्यावर माझ्यासोबत काय झाले? मी मुख्यमंत्र्यापेक्षा कमी काम केलं का?
5) अखिलेशनेच दुसरा पक्ष स्थापून निवडणूक लढवण्याची भाषा केली होती. मी शपथ घेऊन सांगतो, त्यांनीच दुसरा पक्ष काढण्याचा उच्चार केला होता.
६) जमीनीवर कोणाचा कब्जा नसेल, भ्रष्टाचार संपेल तेव्हाच आपण २०१७ साली सरकार स्थापन करू शकू.
७) रामगोपालची दलाली चालू देणार नाही.