दिल्ली विद्यापीठात शिका सावरकरांचे योगदान; इक्बाल यांचे ‘सारे जहाँ से अच्छा’ वगळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 05:47 AM2023-06-11T05:47:01+5:302023-06-11T05:47:27+5:30
दिल्ली विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार बी.ए. (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमामध्ये सावरकर यांचा विषय समाविष्ट करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्लीविद्यापीठाच्या बी.ए. (राज्यशास्त्र) च्या अभ्यासक्रमात ‘सावरकर यांचे योगदान आणि दर्शन’ हा विषय समाविष्ट करण्यावर दिल्ली विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने शिक्कामोर्तब केले.
दिल्ली विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार बी.ए. (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमामध्ये सावरकर यांचा विषय समाविष्ट करण्यात येणार आहे. दिल्ली विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कवी मोहम्मद इक्बाल यांच्या रचना वगळण्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. यापूर्वी दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सावरकर यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. पण त्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. अभ्यासक्रमात सावरकर यांचा समावेश करण्यास विरोध नसला, तरी महात्मा गांधी यांच्या आधी सावरकर यांचे विचार शिकविले जाऊ नये, अशी भूमिका शैक्षणिक परिषदेच्या काही सदस्यांनी घेतली होती.
इक्बाल यांनी ‘सारे जहाँ से अच्छा’ गीत लिहिले, पण त्यांनी ते कधीच मानले नाही, असे कुलगुरू योगेश सिंह यांचे म्हणणे आहे. अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेले विषय ऐच्छिक आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे.