आता मृत्यूची वेळ आधी कळणार; गुगलच्या मशीनचा अद्भुत 'चमत्कार'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 01:24 PM2018-06-19T13:24:05+5:302018-06-19T13:37:57+5:30
आता रुग्णाच्या जगण्याची शक्यता आहे की नाही?, शिवाय त्याचा मृत्यू कधी होणार?, हे सांगणार एक नवीन मशीन विकसित करण्यात आले आहे.
नवी दिल्ली - एखाद्या दुर्धर आजाराचा सामना करणाऱ्या आपल्या जवळच्या व्यक्तीनं कधीच आपल्याला सोडून जाऊ नये, त्या खास व्यक्तीनं कायम आपल्यासोबत राहावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आजारामुळे होणाऱ्या यातनेतूनदेखील त्या व्यक्तीची मुक्तता व्हावी, अशीही प्रार्थना आपण करत असतो. अशातच, ती किती दिवसांची सोबती आहे, या विचारानं आपण आतून पोखरले जातो. मात्र, आता रुग्णाच्या जगण्याची शक्यता आहे की नाही?, शिवाय रुग्णाचा मृत्यू कधी होणार?, हे सांगणार एक नवीन मशीन विकसित करण्यात आले आहे. सर्च इंजिन गुगलनं नुकतेच एक असे एक मशीन विकसित केले आहे, ज्याद्वारे रुग्णाच्या आजाराच्या लक्षणांचा अभ्यास केल्यानंतर त्या रुग्णाकडे जगण्यासाठी किती कालावधी उरला आहे, याची माहिती समजू शकणार आहे.
या मशीनवर आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सचे प्रमुख जेफ डीन यांची 'मेडिकल ब्रेन' कंपनी काम करत आहे. हे मशीन रुग्णांच्या आजाराच्या लक्षणांचं परीक्षण करुन त्याआधारे रुग्णाच्या जगण्याबाबतची शक्यता सांगेल. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डीन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नुकतेच या मशीनद्वारे एका महिला रुग्णाचे परीक्षण करण्यात आले. ब्रेस्ट कॅन्सरनं पीडित असलेल्या या महिलेच्या डॉक्टरांनी काही वैद्यकीय तपासण्या केल्या. तपासणीत समोर आलेल्या आजाराच्या लक्षणांच्या आधारे महिला रुग्णाची केवळ 9.3 टक्के जगण्याची शक्यता वर्तवण्यात आली. याच माहितीवर गुगल मशीननं काम सुरू केले. गुगलनं विकसित केलेल्या मशीननं संबंधित महिलेच्या जगण्याची 19.9 टक्के शक्यता वर्तवली. यानंतर काही दिवसांतच महिलेचा मृत्यू झाला. यानंतर वैद्यकीय तज्ज्ञदेखील अचंबित झाले असून या नवीन मशीनमुळे ते प्रभावित झालेत. विशेष म्हणजे ज्या अहवालांच्या आधारे महिलेच्या मृत्यूसंदर्भातील शक्यता वर्तवण्यात आली, ते सर्व अहवालदेखील गुगलनं सादर केले.
जेफ डीन यांनी मशीनबाबत सांगितले की, जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा व्हावा, या उद्देशानं जगभरातील दवाखान्यांमध्ये ही यंत्रणा पोहोचण्याचे गुगलचे पुढील पाऊल असणार आहे. डीन यांच्यानुसार, आर्टिफिशिअल इन्टेलिजेन्स यंत्रणा आजारांचा शोध घेणे आणि त्यासंबंधी औषधोपचारांसाठी डॉक्टरांची मदत करत आहे.