आता एटीएममधून बाहेर येणार औषधे, प्रत्येक ब्लॉकमध्ये लागणार मशीन; असा आहे सरकारचा संपूर्ण प्लॅन!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 11:10 PM2021-09-17T23:10:03+5:302021-09-17T23:13:36+5:30
या एटीएम मशीनमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी टाकली जाईल आणि त्यानुसार मशीनमधून औषधी बाहेर येईल.
नवी दिल्ली - दुर्गम भागातील गावांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठीही आता चोवीस तास औषधी उपलब्ध होणार आहेत. त्यांना केवळ ब्लॉकमध्ये असलेल्या औषधांच्या एटीएमपर्यंत जावे लागेल. देशातील सर्व सहा हजार ब्लॉकमध्ये, अशा प्रकारचे एटीएम मशीन लावण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. आयटी मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या कॉमन सर्व्हिस सेंटरने (CSC) शुक्रवारी आंध्र प्रदेश सरकारच्या AMTZ नावाच्या कंपनीसोबत यासाठी करार केला. (Now medicines will come out from ATM machines will be installed in every block)
सीएससीचे आधीपासूनच ब्लाक स्तरावर अयूर संजीवनी केंद्र सुरू आहेत. याच केंद्रांवर औषध वितरण करणारे एटीएमदेखील बसविले जातील. गर्भधारणा, कोरोना तपासणी सोबतच, इतरही अनेक वैद्यकीय उपकरणे या केंद्रांवर ठेवली जातील. त्यांच्या ऑपरेशनसाठी CSC च्या ग्रामीण उद्योजकांना पुढील महिन्यापासून प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासंदर्भात जागरण वृत्त संस्थेने वृत्त प्रसिद्ध केले आहे.
CSC कडून गावांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर अथवा कॉन्सन्ट्रेटरही पुरविले जातील. नाममात्र शुल्क देऊन त्यांचा वापर केला जाऊ शकतो. चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या अखेरपर्यंत सर्व ब्लॉकमध्ये औषधींचे एटीएम बसवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
एटीएम मशीनमध्ये टाकली जाणार डॉक्टरांची चिठ्ठी, त्यानुसारच औषध येणार -
जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, सीएससी एसपीव्हीचे एमडी दिनेश त्यागी यांनी सांगितले, की सीएससीच्या संजीवनी केंद्रात व्हर्च्युअल पद्धतीनेच लोक डॉक्टरांचा सल्ला घेतात. औषधांचे प्रिस्क्रिप्शनही व्हर्च्युअल पद्धतीनेच जनरेट होते. मात्र, यानंतर औषधी आणण्यासाठी गावकऱ्यांना एकतर शहरात जावे लागते अथवा कुणाला तरी पाठवून ती माघवावी लागतात. पण आता सर्व ब्लॉक्समध्ये औषधी देणाऱ्या एटीएमची सुविधा होणार असल्याने त्यांना लगेचच औषधी मिळत जाईल. या एटीएम मशीनमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी टाकली जाईल आणि त्यानुसार मशीनमधून औषधी बाहेर येईल.
विशाखापट्टनम येथे प्रशिक्षण -
या मशिन्ससाठी ई-कॉमर्स कंपन्या औषधींचा पुरवठा करतील. यात बहुतांश जेनेरिक औषधेच ठेवली जातील. याशिवाय, केंद्रावर विविध प्रकारच्या चाचण्यांसाठी उपकरणांची सुविधाही असेल. याच बरोबर, पुढील महिन्यापासून एएमटीजेड ग्रामीण उद्योजकांना मेडिकल उपकरणांच्या ऑपरेशनसाठी विशाखापट्टनम येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही त्यागी यांनी सांगितले.