आता पै न् पै येतेय गरिबांच्या खात्यात! २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे युग: पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 12:11 PM2023-08-22T12:11:58+5:302023-08-22T12:12:10+5:30
"देशातील गरिबी कमी झाली, अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप"
भोपाळ : २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे युग होते. गरिबांचे हक्क व पैशांची लूट सुरू होती. मात्र, आता पै न् पै त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे म्हटले.
निती आयोगाच्या अहवालाचा हवाला देत मोदी म्हणाले की, मागील पाच वर्षांत साडेतेरा कोटी भारतीय दारिद्र्यरेषेखालील श्रेणीतून बाहेर आले आहेत. मोठ्या संख्येने लोक कर भरत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. आपल्या पैशांचा सरकारकडून चांगला उपयोग होत असल्याचा विश्वास लोकांत निर्माण झाल्याचे हे द्योतक आहे. लोक अल्प उत्पन्न गटातून उच्च उत्पन्न गटाकडे जात आहेत. सर्व क्षेत्रांना बळ मिळण्यासह रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
नागरिकांचा सरकारवरील विश्वास वाढला आहे. आपला एक-एक पैसा देशाच्या विकासासाठी खर्च होईल, या विश्वासाने ते कर जमा करायला पुढे येत आहेत.
अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप
देशाची अर्थव्यवस्था २०१४ मध्ये जगातील १०व्या स्थानावरून आता ५व्या स्थानावर गेली आहे. गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. २०१४ नंतर भारतात पाच लाख नवीन सुविधा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. ज्यामुळे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
देशातील गरिबी कमी झाली
- मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील सीएम राईझ शासकीय महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षण-सह-अभिमुखता कार्यक्रमाला मोदी डिजिटल माध्यमातून संबोधित करत होते.
- अमृत काळच्या पहिल्याच वर्षात सकारात्मक वृत्तांचा वर्षाव सुरू झाला आहे. ही वृत्ते देशातील घटती गरिबी आणि वाढती समृद्धी दर्शवतात, असेही ते म्हणाले.
पाच वर्षांत साडेतेरा कोटी भारतीय बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) श्रेणीतून बाहेर आले आहेत. आयकर परताव्याच्या संख्येवरून असे दिसून येते की, भारतीयांचे सरासरी उत्पन्न २०१४ मधील ४ लाख रुपयांवरून गेल्या नऊ वर्षांत १३ लाख रुपये झाले आहे.
- नरेंद्र माेदी, पंतप्रधान