आता तेल कारखाने रडारवर?
By admin | Published: October 19, 2016 04:56 AM2016-10-19T04:56:17+5:302016-10-19T04:56:17+5:30
भारताच्या तेल कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून पाकिस्तानचा हेर माहिती मिळवताना आढळल्यानंतर देशातील तेल कारखान्यांना पाकिस्तानने आपले लक्ष्य केल्याचे दिसते.
नवी दिल्ली : भारताच्या तेल कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून पाकिस्तानचा हेर माहिती मिळवताना आढळल्यानंतर देशातील तेल कारखान्यांना पाकिस्तानने आपले लक्ष्य केल्याचे दिसते.
या तेल कारखान्यांची सुरक्षा वाढवा आणि माहिती सुरक्षित ठेवा, असा सल्ला गुप्तचर विभागाने (आयबी) तेल मंत्रालयाला दिला आहे. पाकिस्तानी हेर तेल कारख्यान्याच्या कार्यकारी अधिकाऱ्याकडून माहिती घेत असल्याचे संभाषण आयबीने पकडल्यानंतर हा सल्ला देण्यात आला आहे.
काश्मीरमधील उरी येथे लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी छावण्यांवर लक्ष्यभेदी कारवाया केल्या. यानंतर दोन्ही बाजुंकडून सीमा भागांत संघर्ष वाढण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर संस्था आणि संरक्षण दले अतिसावध झाली आहेत. आयबीने नुकतेच एक संभाषण पकडले. त्यात पाकिस्तानी हेर स्वत:ला भारताच्या परराष्ट्र गुप्तचर संस्थेचा (रॉ) अधिकारी असल्याचे सांगून राजस्थानमधील संवेदनशील अशा हायड्रोकार्बन पाईपलाईनचे व्यवस्थापन बघणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी फोनवर बोलत होता. संभाषणात त्याने त्या पाईपलाईनचे महत्वाचे व संवेदनशील तपशील मिळवले, असे या विषयाशी थेट संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले. आयबीने अनेक पाकिस्तानी हेर सीमेपलीकडून तसेच भारतातूनही तेल कारख्यान्यांचा तपशील मिळवण्यासाठी तेल कारखान्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना फोन करीत आहेत, असा इशारा दिला आहे.
तेल मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्रालयाकडे असून ते योग्य ती कार्यवाही करील. इंडियन आॅईल कार्पोरेशनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की उत्तर भारतातील तेल शुद्धीकरण कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना व सुरक्षा कर्मचाऱ्यांना आम्ही परिस्थितीचे गांभीर्य सांगितले आहे. तेल शुद्धीकरण कारख्यान्याची पाईपलाईन उडवून देण्यामुळे किंवा तिची हानी केल्यामुळे काही विभागांत तेलाच्या टंचाईचा दीर्घ काळचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. शिवाय जीवित हानी व पायाभूत सुविधांचेही नुकसान होऊ शकते, असेही सांगण्यात
आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)