आता बँकेत नाही बदलून मिळणार जुन्या नोटा..
By Admin | Published: November 18, 2016 05:05 PM2016-11-18T17:05:14+5:302016-11-18T17:28:57+5:30
बँकेतून (५०० व १ हजार रुपयांच्या) जुन्या नोटा बदलून मिळण्याचा निर्णय लवकरच रद्द होणार असल्याचे वृत्त आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - बँकेतून जुन्या नोटा बदलून मिळण्याचा निर्णय लवकरच रद्द होणार असल्याचे वृत्त आहे. बँकेतून ५०० व १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्याच्या सवलतीचा काही लोकांकडून गैरफायदा घेण्यात येत असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काळ्या पैशाविरोधातील मोहिम तीव्र करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात ५०० व १ हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत बँकेतून ४५०० रुपयांपर्यंतची रक्कम बदलून घेता येईल, असे सरकारने जाहीर केले होते. त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी बँकेबाहेर लांबच्या लांब रांगा लावल्या. मात्र च काही काळा पैसा धारकांनी आपल्याकडील बेहिशोबी रकमेची विल्हेवाट लावण्यासाठी रोजंदारीवर माणसे लावत काळा पैसा बदलून घेतला. रोख रकमेच्या तुटवड्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली, परिणामी बँकांबाहेरील रांगाही वाढत गेल्या.
मात्र आता आठवड्याभरानंतर पुरेशा नोटा चलनात आल्या असून बँका तसेच एटीएममध्येही पैसे मिळत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
याच पार्श्वभूमीवर जुन्या नोटा बदलून मिळणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता नागरिकांना बँक खात्यात (जुन्या नोटा) पैसे जमा करावे लागणार आहेत. व त्यानंतर बँक खात्यातून वा एटीएममधून ते पैसे काढून घेता येतील.
मात्र ज्या नागरिकांचे बँक खाते नाही, त्यांची गैरसोय होणार असून त्यांना नोटा कशा बदलून मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.