चित्रपटातील संधीसाठी आता आॅनलाईन आॅडिशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2016 11:38 PM2016-01-05T23:38:59+5:302016-01-05T23:38:59+5:30
तुम्हाला चित्रपटात काम करायची इच्छा आहे? तर मग आता आॅडिशन देण्यासाठी मुंबईला येऊन वेगवेगळ्या निर्माते आणि दिग्दर्शकांचे उंबरे झिजवण्याची गरज नाही.
मुंबई : तुम्हाला चित्रपटात काम करायची इच्छा आहे? तर मग आता आॅडिशन देण्यासाठी मुंबईला येऊन वेगवेगळ्या निर्माते आणि दिग्दर्शकांचे उंबरे झिजवण्याची गरज नाही. कारण ‘बॉम्बेकास्टिंग डॉट कॉम’ या पोर्टलने अभिनव सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इच्छुकांसाठी या पोर्टलतर्फे ६ जानेवारी ते २१ जानेवारीदरम्यान आॅनलाईन आॅडिशनचे आयोजन करण्यात आले आहे.
बॉम्बेकास्टिंगचे संस्थापक आणि ‘गँग आॅफ वासेपूर’सारख्या गाजलेल्या चित्रपटाचे निर्माते सुनील बोहरा यांनी सांगितले की, कलाकारांनी आपल्या अभिनयाचे रेकॉर्डिंग करून ते वेबसाईटवर अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देतानाच, या वेबसाईटद्वारे त्यांच्या आॅडिशन्स दिग्गज निर्माते-दिग्दर्शकांपर्यंत पोहोचविण्यात येतील.
याच अनुषंगाने, ६ ते २१ जानेवारी दरम्यान एका विशेष आॅडिशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक कलाकारांनी आपल्या अभिनयाचे रेकॉर्डिंग बॉम्बे कास्टिंगच्या वेसबाईटवर अपलोड करायचे आहे. या आॅडिशन्स आनंद एल. राय, हंसल मेहता, तिगमांशु धुलिया यांच्यासारख्या विख्यात दिग्दर्शकांना सादर करण्यात येणार आहेत. पहिल्या क्रमांकाच्या कलाकाराला ११ लाख रुपयांचे बक्षीस तसेच, यांच्यासोबत चित्रपटाचे कॉन्ट्रॅक्ट, तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे पाच लाख रुपये व दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांना चित्रपट, डॉक्युमेंटरी, जाहिरातींमध्ये १०० दिवसांचे काम देण्यात येईल. इच्छुकांनी www.Bombaycasting.com या वेबसाईवर संपर्क साधावा.