मोबाईलमध्येच आता ‘पॅनिक बटन’
By Admin | Published: October 3, 2015 01:09 AM2015-10-03T01:09:49+5:302015-10-03T01:09:49+5:30
महिला सुरक्षेसाठी सेलफोनमध्येच ‘पॅनिक बटन’ आणण्याची सरकारची योजना आहे. त्यानुसार या ‘फीचर’ची व्यवहार्यता तपासून बघून त्यावर काम करण्याचे निर्देश सर्व मोबाईल कंपन्यांना देण्यात आले आहेत
नवी दिल्ली : महिला सुरक्षेसाठी सेलफोनमध्येच ‘पॅनिक बटन’ आणण्याची सरकारची योजना आहे. त्यानुसार या ‘फीचर’ची व्यवहार्यता तपासून बघून त्यावर काम करण्याचे निर्देश सर्व मोबाईल कंपन्यांना देण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यांत ही योजना प्रत्यक्ष सुरू होईल, अशी अपेक्षा महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी विद्यार्थिनींच्या समस्येशी संबंधित मुद्यांवर ‘विद्यार्थी परिषदेला’ संबोधित करताना महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी ही माहिती दिली. मुली वा महिला स्वत:च्या सुरक्षेसाठी वा आपत्स्थितीला तोंड देण्यासाठी काय करू शकतात? याबाबत सूचना व अभिप्राय मागितल्यानंतर संकटकाळात संदेश पाठविण्याची व्यवस्था असलेले विशेष प्रकारचे हार, ब्रेसलेट, अंगठ्या महिला व तरुणींनी धारण करण्याची सूचना आम्हाला आली. पण महिला कैदी नाहीत, तर मग स्वत:च्या सुरक्षेसाठी त्यांनी कायम ही उपकरणे का धारण करावी, असा प्रश्न समोर आला. याच विचारातून पॅनिक बटण देण्याचा पर्याय समोर आल्याचे गांधी म्हणाल्या.