आता नवीन संसदेत लिहिला जाणार इतिहास; जुन्या इमारतीचे काय होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 11:49 AM2023-09-18T11:49:09+5:302023-09-18T11:50:18+5:30

New And Old Parliament Building: जुनी संसद इमारत कधी बांधली गेली? देशाच्या स्वातंत्र्यापासून अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेल्या या इमारतीचे आता पुढे काय होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

now parlimentary work to start in new sansad building know what govt decision about old parliament sansad building | आता नवीन संसदेत लिहिला जाणार इतिहास; जुन्या इमारतीचे काय होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आता नवीन संसदेत लिहिला जाणार इतिहास; जुन्या इमारतीचे काय होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय

googlenewsNext

New And Old Parliament Building:संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नवीन संसद भवनाच्या 'गज द्वार' येथे राष्ट्रध्वज फडकावला. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या एक दिवस आधी हा विशेष कार्यक्रम झाला. कारण या अधिवेशनात संसदेचे कामकाज जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनात हलवले जाणार आहे. यानंतर आता जुन्या संसद भवनाचे काय होणार, याबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. 

संसदेच्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी खासदार संसदेच्या ७५ वर्षांचा प्रवास, संविधान सभेपासून आजपर्यंतच्या कामगिरी, अनुभव, आठवणी आणि धडे यावर चर्चा करतील आणि त्यासोबत जुन्या संसद भवनाच्या लोकशाही प्रवासाची चर्चा होईल. समाप्त होईल. २८ मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. आता संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज नव्या संसद भवनात सुरू झाल्यानंतर जुन्या संसद भवनाचे काय होणार, असा प्रश्न देशवासीयांच्या मनात आहे. मात्र, संसदेच्या जुन्या इमारतीबाबत केंद्र सरकारने आधीपासून नियोजन करून ठेवले असल्याचे सांगितले जात आहे. 

जुन्या इमारतीचे काय होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, संसदेची जुनी इमारत पाडली जाणार नाही. देशाची पुरातत्व संपत्ती असल्याने त्याचे जतन केले जाईल. या इमारतीचा उपयोग संसदेशी संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केला जाणार आहे. एका अहवालानुसार, जुन्या संसद भवनाचे संग्रहालयात रूपांतर केले जाऊ शकते. सेंट्रल व्हिस्टाच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ही केंद्र सरकारची योजना आहे. संसद भवनाचे संग्रहालयात रूपांतर झाल्यानंतर लोकसभेच्या चेंबरमध्येही भेट देणारे बसू शकतात, असे म्हटले जात आहे. 

जुनी इमारत कधी बांधली होती? 

मुळात जुन्या संसद भवनाला कौन्सिल हाऊस म्हटले जात होते. जुन्या संसद भवनाची रचना ब्रिटिश आर्किटेक्ट सर एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी केली होती. ही इमारत पूर्ण होण्यासाठी सहा वर्षे लागली. ही इमारत १९२७ मध्ये पूर्ण झाली. तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी १८ जानेवारी १९२७ रोजी जुन्या संसद भवनाचे उद्घाटन केले. या वास्तूने ब्रिटिशकालीन वसाहतवादी राजवट, दुसरे महायुद्ध, स्वातंत्र्याची पहाट, राज्यघटना निर्मिती आणि अनेक विधेयके पारित होताना पाहिले. १९११ मध्ये जेव्हा ब्रिटिश सरकारने राजधानी कोलकाताहून दिल्लीला हलवली. त्यावेळी नवी दिल्लीतील रायसीना हिल भागात याचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. 

भारताचे स्वातंत्र्य अन् ऐतिहासिक घटनांची साक्षीदार

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि ही इमारत भारताच्या अधिपत्याखाली आली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या जुन्या संसद भवनातून मध्यरात्री 'ट्रिस्ट विथ डेस्टिनी' हे प्रसिद्ध भाषण दिले होते. संसद भवन भारताच्या लोकशाहीचा आत्मा मानले जाते.संविधान सभेच्या सदस्यांनी नव्या राज्यघटनेसाठी केलेल्या विचारमंथनाचीही ही वास्तू साक्षीदार आहे. सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड ही राज्ये निर्माण होताना या वास्तूने पाहिली. दीव, दमण, दादरानगर हवेली आणि पुदुच्चेरी (पूर्वीचे पाँडेचेरी) यांचा भारतात समावेश करण्याबाबत येथे चर्चा झाली. १९६२ मध्ये चीनविरुद्ध भारताचा पराभव आणि १९७१ मध्ये पाकिस्तानवर देशाचा विजय यावरून सरकार आणि विरोधकांमधील झगडे या इमारतीने पाहिले. 

दरम्यान, जिमी कार्टर आणि बराक ओबामा यांसारख्या परदेशी मान्यवरांना येथील भारतीय संसदेच्या संयुक्त सभागृहांना संबोधित करण्याचा मान मिळाला. आरक्षण, जम्मू-काश्मीरसंदर्भातील अनुच्छेद ३७० हटवणे यांसह अनेक ऐतिहासिक विधेयके, क्षणांची साक्षीदार जुनी इमारत राहिली आहे. याचे जतन केले जाणार आहे.

 

Web Title: now parlimentary work to start in new sansad building know what govt decision about old parliament sansad building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.