बाललैंगिक गुन्हेगारांचा आता मानसिक अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 04:34 AM2019-08-11T04:34:27+5:302019-08-11T04:34:51+5:30
बाल अधिकार क्षेत्रातील सर्वोच्च संस्था एनसीपीसीआरने एम्सला सोबत घेऊन बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांचा मानसिक अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील देवरिया आणि बिहारातील मुजफ्फरपूर येथील बालगृहांत बालकांवर झालेल्या गंभीर लैंगिक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बाल अधिकार क्षेत्रातील सर्वोच्च संस्था एनसीपीसीआरने एम्सला सोबत घेऊन बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांचा मानसिक अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) मे महिन्यात एम्सच्या अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात एक बैठक घेतली होती. बालगृहातील मुले आणि किशोरांवरील लैंगिक अत्याचाराचा अभ्यास करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार अशा गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास केला जाणार आहे.
या अभ्यासातून बाल लैंगिक गुन्हेगारांची मानसिक रूपरेखा (सायकॉलॉजिकल प्रोफायलिंग) तयार केली जाणार आहे. ‘सायकॉलॉजिकल प्रोफायलिंग आॅफ माइंड आॅफ इनकार्सरेटेड चाईल्ड सेक्शुअल आॅफेंडर इन इंडिया : इम्प्लिकेशन फॉर डेव्हलपमेंट आॅफ ट्रिटमेंट इंटरव्हेन्शन’ असा या अभ्यासाचा विषय असेल.
एनसीपीसीआरने जारी केलेल्या निवेदनानुसार, या प्रस्तावाची आधी समीक्षा केली जाईल. एम्सशी सल्लामसलत केली जाईल. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर अभ्यास सुरू केला जाईल. उत्तर प्रदेशातील देवरिया आणि बिहारातील मुजफ्फरपूर येथील बालगृहांत लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर हा अभ्यास करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
बालगृहात झाले होते अत्याचार
गेल्या वर्षी मुजफ्फराबादच्या बालगृहातील ३४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. याप्रकरणी बालगृहाचे संचालन करणाºया स्वयंसेवी संस्थेचा मालक ब्रजेश ठाकूर याच्यासह ११ जणांवर एफआयआर नोंदविण्यात आला होता.
गेल्या वर्षीच्याच अन्य घटनेत उत्तर प्रदेशातील देवरिया येथील बालगृहात बालकांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळून आले होते. एक १0 वर्षीय मुलगी बालगृहातून पळून आल्यानंतर ही घटना उजेडात आली होती. बालगृह चालविणारे जोडपे बालगृहातील २४ मुलींचे लैंगिक शोषण करीत असल्याचे समोर आले होते.