आता पंजाबही पाकिस्तानचे पाणी रोखणार; धरणाचे आज भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 09:34 AM2019-03-08T09:34:48+5:302019-03-08T09:35:48+5:30
यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रम चारवेळा रद्द झाला होता.
पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानचे पाणी रोखण्याचे संकेत दिलेले असताना आता पंजाब सरकारनेही या दिशेने पाऊल उचलले आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये आज मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आज पठानकोट येथे धरणाच्या कामाचे भूमिपूजन करणार आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रम चारवेळा रद्द झाला होता. जिल्हाधिकारी रामवीर यांनी रावी येथिल विश्रामगृहावर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेत धरणाच्या जागेचीही पाहणी केली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती दिली.
पंजाब सरकारने या धरणासाठी 206 कोटी रुपये मंजूर केले असून एकूण खर्च 2700 कोटी रुपये अपेक्षित आहे.
पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, पाकिस्तानची सार्वत्रिक कोंडी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास भारताने तयारी सुरू आहे. आता सिंधू जल करारातून माघार घेण्याच्या दिशेने भारताने पावले उचलली असून, त्यानुसार काश्मीर खोऱ्यातून पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या नद्यांचे पाणी मोठी धरणे बांधून पूर्वेकडे वाहत येणाऱ्या नद्यांमध्ये वळवण्यात येणार आहे. त्याचा फायदा जम्मू काश्मीर आणि पंजाबसह इतर राज्यांना होणार आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धखोरीची धमकी दिलेली असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तोंडचे पाणी पळविण्याचा थेट इशाराच देऊन टाकला होता. पुलवामा आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर गडकरी यांनी केलेले महत्वाचे मानले जात होते. अखेरीस यासंदर्भातील घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे.
केंद्र सरकारच्यावतीने सिंधू जल कराराविषयी माहिती देताना गडकरींनी सांगितले की पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या तीन नद्यांचे पाणी या नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या धरणांमधून रोखण्यात येईल. त्यानंतर हे पाणी पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये वाहत येणाऱ्या नद्यांमध्ये प्रवाहित करण्यात येईल.
उत्तर प्रदेशमधील बागपत येथील एका सभेमध्ये गडकरी यांनी पाकिस्तानला तोंडचे पाणी पळविण्याचा इशारा दिला होता. भारतातून वाहणाऱ्या तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला जाते. हे पाणी यमुना नदीला जोडू आणि पाकिस्तानला ओसाड बनविण्याची धमकीच त्यांनी दिली आहे. या तिन्ही नद्यांना जोडण्याच्या प्रकल्पावर काम सुरु आहे. याद्वारे जलवाहतुकही सुरु केली जाईल असे गडकरी यांनी सांगितले.