रेल्वेतही आता विमानासारखी यंत्रणा, अपघाताचं कारण कळणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 07:41 AM2018-10-16T07:41:20+5:302018-10-16T07:43:35+5:30
रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होणार
नवी दिल्ली: रेल्वेतही आता विमानाप्रमाणेच ब्लॅक बॉक्सचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे अपघाताचं नेमकं कारण समजण्यास मदत होईल. याशिवाय मोटरमनचं कामदेखील अधिक सोपं होणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी लवकरच रेल्वे गाड्यांमध्ये लोको कॅब व्हॉईस रेकॉर्डिंग (एलसीव्हीआर) यंत्र लावण्यात येईल. रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं सोमवारी याबद्दलची माहिती दिली.
व्हॉईस रेकॉर्डर सर्वसाधारणपणे ब्लॅक बॉक्स नावानं ओळखला जातो. रेल्वेकडून सध्या या प्रणालीवर काम सुरू आहे. ब्लॅक बॉक्समुळे रेल्वे इंजिनासह विविध घटकांची माहिती रेकॉर्ड होऊ शकते. यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती आणि आकडेवारी रेल्वे अधिकाऱ्यांना मिळेल. त्यामुळे अपघाताचं नेमकं कारण शोधण्यात मोठी मदत होईल. यामुळे प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीकोनातून पावलं उचलणं सोपं होऊ शकतं. अनेक मानवी आणि तांत्रिक चुका रेकॉर्ड करण्यात ब्लॅक बॉक्स महत्त्वाची भूमिका बजावतो.
आताच्या घडीला विमानांमध्ये ब्लॅक बॉक्सचा वापर होतो. यामध्ये दोन वेगवेगळी उपकरणं असतात. यातील एकात उड्डाणासंदर्भातील आकडेवारीची नोंद होते. तर दुसऱ्या उपकरणात कॉकपिटमधील संवाद रेकॉर्ड होतो. ब्लॅक बॉक्स विमानाच्या मागील बाजूस असतो. ब्लॅक बॉक्सचं आवरण अतिशय मजबूत स्टिल किंवा टायटेनियमपासून तयार करण्यात येतं. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यास ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. कितीही मोठा दाब सहन करु शकेल, अशी त्याची रचना असते. विमान अपघातांचं कारण शोधण्यात ब्लॅक बॉक्सनं अनेकदा महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.