आता रशियन हेलिकॉप्टर भारतातून होणार हद्दपार; DRDO आणि HL करणार निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 10:58 AM2023-02-20T10:58:04+5:302023-02-20T10:58:23+5:30
दशकभरात होणार प्रक्रिया, ‘एचएएल’ची निर्मिती
नवी दिल्ली : भारत आता शस्त्रास्त्रांच्या बाबतीत इतर देशांवरील अवलंबित्व कमी करत आहे. त्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि डीआरडीओ यांचा हात आहे. रशियन एमआय-१७ची जागा घेण्यासाठी भारताकडे येत्या ८ ते १० वर्षांत स्वदेशी मध्यम - उड्डाण क्षमता असलेले हेलिकॉप्टर घेण्याची शक्यता आहे.
एचएएलचे मुख्य व्यवस्थापक (डिझाइन) एरोडायनॅमिक्स अब्दुल रशीद ताजर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, भविष्यातील १३ टन भारतीय बहुविध हेलिकॉप्टरची (आयएमआरएच) प्राथमिक रचना आधीच सुरू केले आहे. आम्ही निधीची वाट पाहत आहोत. संरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीच्या मंजुरीनंतर चार वर्षांच्या आत आम्ही प्रतिकृतीच्या पहिल्या उड्डाणासाठी सज्ज होऊ आणि पुढील चार वर्षांत चाचणी प्रमाणपत्र प्राप्त करू. भारतीय हवाई दलात आठ वर्षांनंतर समावेशासाठी ते तयार असतील आणि हळूहळू ते रशियन एमआय-१७ ची जागा घेतील.
देशातील स्वदेशी मध्यम उड्डाण क्षमतेचे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाच्या वाहतूक ताफ्यातील उणीव भरून काढेल. भारतीय वायुसेनेकडे सध्या सुमारे २५० एमआय-१७ हेलिकॉप्टर आहेत. प्रत्येक हेलिकॉप्टर ३०हून अधिक सैनिक आणि अनेक शस्त्रे वाहून नेऊ शकते. आयएमआरएच हवाई हल्ला, हवाई वाहतूक, लढाऊ रसद, लढाऊ शोध आणि बचावकार्यासाठी सक्षम असेल. ते ४,५०० किलोपर्यंतचा भार वाहून नेण्यास सक्षम
३०० कोटींना हेलिकॉप्टर
हेलिकॉप्टरचे इंजिन फ्रान्सचे सॅफ्रान हेलिकॉप्टर इंजिन आणि एचएएलतर्फे संयुक्तपणे विकसित केले जाईल. एरो इंडिया प्रदर्शनादरम्यान यासंदर्भात करार केला. प्रत्येक हेलिकॉप्टरची किंमत ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे व एचएएलला किमान ५०० पेक्षा जास्त हेलिकॉप्टरची ऑर्डर अपेक्षित आहे.