आता शाळेमध्ये ‘गुड मॉर्निंग’ नव्हे ‘जय हिंद’ बोला! १५ ऑगस्टपासून हरयाणातील शाळांमध्ये उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 10:10 AM2024-08-10T10:10:49+5:302024-08-10T10:11:27+5:30
१५ ऑगस्टपासून शाळांमध्ये हा आदेश लागू करण्यात आला आहे.
चंदीगड : हरयाणातील सर्व शाळांमध्ये या स्वातंत्र्य दिनापासून आता ‘गुड मॉर्निंग’च्या जागी ‘जय हिंद’ बोलण्यात येणार आहे. ‘जय हिंद’ बोलल्याने विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण येत राहील, असे असे सरकारने म्हटले आहे. १५ ऑगस्टपासून शाळांमध्ये हा आदेश लागू करण्यात आला आहे.
१५ ऑगस्ट रोजी शाळांमध्ये देशभक्तीचे वारे वाहू लागतील आणि मुले एकमेकांना शिवाय आपल्या शिक्षकांना जय हिंद म्हणतील, अशा सूचना शिक्षण संचालकांनी जिल्हा व गट अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्राचार्य आणि मुख्याध्यापक ही व्यवस्था अमलात आणतील.
‘जय हिंद’च का?
- ‘जय हिंद’ ही घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान दिली होती आणि स्वातंत्र्यानंतर सशस्त्र दलांनी सलामी म्हणून ती स्वीकारली होती, असे परिपत्रकात म्हटले होते.
- शालेय शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा गटशिक्षणाधिकारी, गट प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांना पाठवले आहे.
उद्देश काय?
एका सरकारी परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. हरयाणा सरकारने सुरू केलेल्या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करणे आहे, असे राज्य सरकारच्या शालेय शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
काय आहे परिपत्रकात?
परिपत्रकानुसार, ‘गुड मॉर्निंग’ ऐवजी ‘जय हिंद’ आता शाळांमध्ये वापरण्यात येणार आहे, यामुळे विद्यार्थी दररोज ‘राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेने प्रेरित’ होऊन देशाच्या समृद्ध इतिहासाबद्दल आदर व्यक्त करू शकतील.
देशभक्तीपर अभिवादन ‘जय हिंद’ विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीरांच्या केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यास प्रोत्साहित करेल. ‘जय हिंद’ प्रादेशिक, भाषिक आणि सांस्कृतिक भेदांच्या पलीकडे जाऊन विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांमध्ये एकतेला प्रोत्साहन देते, असे परिपत्रकात म्हटले आहे.