आता शाळा शिकविणार नाहीत मुघलांचा इतिहास, उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 07:27 AM2023-04-04T07:27:36+5:302023-04-04T07:28:01+5:30
एनसीईआरटीची पुस्तके स्वीकारल्याने झाला बदल
लखनौ: उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने २०२३-२४ या शैक्षणिक सत्रासाठी उत्तर प्रदेश मंडळ आणि सीबीएसई मंडळाच्या अभ्यासक्रमाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना यापुढे शाळांमध्ये मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. एनसीईआरटीने जून २०२२ मध्ये मुघल इतिहास, शीतयुद्ध इत्यादी प्रकरणे काढली होती. उत्तर प्रदेश मंडळाने एनसीईआरटीची पुस्तके आणि त्यांचा अभ्यासक्रम राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, आज किंवा या महिन्यात कोणताही नवीन धडा काढला नाही. यापूर्वी असे वृत्त होते की, उत्तर प्रदेश सरकारने इतिहासाच्या पुस्तकातून काही राज्यकर्ते आणि मुघल दरबारावरील धडे काढले आहेत. अकरावीच्या पुस्तकातून इस्लाम संस्कृतीचा उदय, संस्कृतींचा संघर्ष, औद्योगिक क्रांती, काळाची सुरुवात आदी धडे काढून टाकल्याचेही वृत्त होते. २०२० मध्ये सरकारने आग्रा येथील संग्रहालयाचे नाव बदलल्यानंतर योगींनी ट्वीट केले होते की, ‘आग्रामध्ये निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाईल. नव्या उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेच्या प्रतीकांना स्थान नाही.
या आधीही घेतले अनेक निर्णय
मुघलांचे नाव आणि इतिहासाबाबत योगी सरकारने यापूर्वीच निर्णय घेतले आहेत. २०२० मध्ये योगी सरकारने आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय केले.
नागरिकशास्त्राच्या पुस्तकातही बदल
उपमुख्यमंत्री बृजेश पाठक म्हणाले की, लोक आपल्या संस्कृतीपासून वंचित होते, आम्ही लोकांना खरी संस्कृती सांगू. आता बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकलेल्या विषयांत ‘अकबरनामा’ (अकबराच्या कारकीर्दीचा अधिकृत इतिहास) व ‘बादशाहनामा’ (मुघल सम्राट शाहजहानचा इतिहास) समाविष्ट आहे. याशिवाय नागरिकशास्त्राच्या पुस्तकातही बदल करण्यात आले आहेत. स्वतंत्र भारतातील राजकारणाच्या पुस्तकातून जनआंदोलनांचा उदय आणि एका पक्षाच्या वर्चस्वाचा काळ हा अध्यायही बदलण्यात आला आहे.
भाजप सरकार मुस्लिमांविरोधात जे काही काम करू शकते, ते सर्वकाही करत आहे; परंतु केवळ उत्तर प्रदेशातून मुघल राजवटीचा इतिहास काढून काही होणार नाही. हा इतिहास केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात मजबूत आहे. मुघल सम्राटांनी भारताला प्रगतीच्या मार्गावर नेले. सरकारने जुनी इतिहासाची पुस्तकेही जप्त करावी, जेणेकरून काहीही पुरावा राहणार नाही. -नवाब इकबाल महमूद, माजी माध्यमिक शिक्षणमंत्री, आमदार, सपा