आता राजकारणात संघर्ष , रजनीकांत यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 02:54 AM2018-01-01T02:54:15+5:302018-01-01T02:54:54+5:30

तामिळनाडूच्या तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्यातील राजकीय स्थितीही अस्थिर झालेली असताना रजनीकांत यांचा राजकारण प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.

 Now the struggle in politics, Rajinikanth's entry into the political arena | आता राजकारणात संघर्ष , रजनीकांत यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश

आता राजकारणात संघर्ष , रजनीकांत यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश

Next

चेन्नई : तामिळनाडूच्या तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्यातील राजकीय स्थितीही अस्थिर झालेली असताना रजनीकांत यांचा राजकारण प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. दक्षिणेतील दोन स्टार रजनीकांत व कमल हसन यांच्यात चित्रपटात असणारी स्पर्धा आता राजकारणात पहायला मिळेल.
मागे वळून पाहिले तर, रजनीकांत आणि कमल हसन यांच्यातील ही स्पर्धा स्पष्ट दिसते. मद्रासमध्ये (आता चेन्नई) फिल्म इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रजनीकांत बालाचंदर यांच्याकडे गेले आणि चित्रपटात काही संधी मिळते काय याचा शोध सुरु केला. कमल हसन यांनी एका कार्यक्रमात या आठवणी सांगितल्या होत्या. कमल हसन म्हणाले होते की, बालाचंदर यांच्या कार्यालयात छोट्या खिडकीतून मी एका व्यक्तीला विचारले की, आपण पुणे इन्स्टिट्यूटमधून आला आहात काय? तर तो तरुण म्हणाला की नाही, मी मद्रास इन्स्टिट्यूटमधून आलो आहे. तो व्यक्ती होती रजनीकांत. बालचंदर यांनी रजनीकांत यांना पसंती दिली आणि तेव्हापासून कमल हसन यांना एक प्रतिस्पर्धी तयार होण्यास सुरुवात झाली. १९७५ मध्ये रजनीकांत यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीस सुरुवात केली. १९७८ मध्ये त्यांना चित्रपटात प्रमुख भूमिका मिळू लागल्या.
कमल हसन हे बुद्धीप्रामाण्यवादी तर, रजनीकांत हे देवावर प्रचंड श्रद्धा असणारे व्यक्तिमत्व. काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी केशरी हा आपला रंग नसल्याचे सांगत आपला भविष्यातील प्रवास कसा असेल याचे संकेत दिले होते. रजनीकांत यांची भाजपशी असलेली जवळीक लपून राहिलेली नाही. नोटाबंदीनंतर रजनीकांत यांनी मोदी यांची प्रशंसा केली होती. राजकारणातील आपली नवी इनिंग सुरु करणाºया कमल हसन आणि रजनीकांत यांनी स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करणारे सरकार देण्याचे वचन दिले आहे. मावळत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी आपल्या समर्थकांशी बोलताना रजनीकांत म्हणाले की, तुम्ही मला खूप पैसा आणि प्रसिद्धी दिली आहे. मला अपेक्षाही नव्हती एवढे तुम्ही मला प्रेम दिले आहे. पैसा आणि प्रसिद्धीसाठी मी राजकारणात येत नाहीय. मला सत्तेची इच्छाही नाही. १९९६ मध्ये मला तशी संधी आली होती. पण, मी ही संधी नाकारली. त्यावेळी मी ४५ वर्षांचा होतो. आता ६८ वर्षांचा असताना मी अशी इच्छा कशाला बाळगू?

हो नाही करता करता सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर राजकारणाचा मार्ग निवडला आहे. रजनीकांत यांनी १९९५ मध्ये प्रथम राजकारणावर भाष्य करत स्पष्ट केले होते की, मला राजकारणात रस नाही. देवाच्या कृपेने माझ्याकडे प्रसिद्धी आणि पैसा आहे.
मात्र, एक वर्षातच १९९६ मध्ये रजनीकांत यांनी द्रमुकचे समर्थन केले आणि स्पष्ट केले की, जर जयललिता सत्तेत परत आल्या तर, देवही तामिळनाडूला वाचवू शकत नाही.

आठ वर्षांनंतर रजनीकांत अण्णाद्रमुक- भाजपला समर्थन देण्यासाठी पुढे आले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील भाजप आघाडीसाठी मी मतदान करणार आहे. पण, मी तुम्हाला असे करण्याचा
आग्रह करणार नाही, असे त्यांनी
स्पष्ट केले होते.

कमल हसन, अमिताभसह मान्यवरांच्या शुभेच्छा
बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन आणि कमल हसन यांच्यासह अनेक दिग्गजांनी रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत. कमल हसन यांनी पोस्ट केले आहे की, रजनीकांत यांनी स्वीकारलेली सामाजिक जबाबदारी आणि राजकारण प्रवेशाचे मी स्वागत करत आहे.
अमिताभ बच्चन यांनी व्टिट केले आहे की, माझा मित्र, माझा सहकारी आणि एक विनम्र व्यक्ती रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या यशस्वीतेसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. काँग्रेस प्रवक्त्या खुशबू सुंदर यांनी व्टिट केले आहे की, आम्हाला याची जाणीव आहे की, लोकशाही आणि विकासावर रजनीकांत हे विश्वास ठेवतात. त्यांच्या प्रयत्नांसाठी आमच्या शुभेच्छा.
भाजपने रजनीकांत यांच्या प्रवेशाचे स्वागत केले आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे की, रजनीकांत यांचे पक्षात प्रवेशासाठी स्वागत आहे. दक्षिणेत पक्षाच्या विस्तारासाठी भाजप अनेक दिवसांपासून रजनीकांत यांना गळ लावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत महिन्यात चेन्नई दौºयात रजनीकांत यांच्याशी चर्चा
केली होती.

आम्हाला आव्हान नाही : अण्णाद्रमुक, द्रमुक
रजनीकांत यांचा राजकीय प्रवेश तामिळनाडूच्या राजकारणात एखाद्या भूकंपापेक्षा निश्चितच कमी नाही. सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांनी मात्र रजनीकांत हे आमच्यासाठी आव्हान नसल्याचे सूरात सूर लावत सांगितले आहे. अण्णाद्रमुकचे मंत्री जयकुमार म्हणाले की, आमचा पक्ष मजबूत आहे. आमच्यावर याचा परिणाम होणार नाही. द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, रजनीकांत यांचे मी अभिनंदन करतो. आपल्या समर्थकांची प्रतीक्षा त्यांनी संपविली आहे. मात्र, द्रमुकसाठी याचा कोणताही सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होणार नाही.

२०१४ नंतर रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या. पण, राजकारणात जावे की, नाही याबाबत रजनीकांत यांचा संभ्रम कायम राहिला.
अखेर रविवारी रजनीकांत यांनी ती घोषणा केली ज्याची प्रतीक्षा त्यांचे समर्थक अनेक वर्षांपासून करत होते.

Web Title:  Now the struggle in politics, Rajinikanth's entry into the political arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.