आता ग्रामीण भागातही इंटरनेट सुपरफास्ट चालणार, इस्रो जीसॅट-२० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 09:14 AM2024-01-04T09:14:08+5:302024-01-04T09:14:27+5:30
...इस्रो या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीसॅट-२० हा उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन-९ या अग्निबाणाद्वारे अवकाशात प्रक्षेपित करणार आहे.
नवी दिल्ली : देशाच्या ब्रॉडबँड, इन-फ्लाईट व मेरिटाइम कम्युनिकेशन (आयएफएमसी) क्षेत्रातील वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी इस्रो या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीसॅट-२० हा उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन-९ या अग्निबाणाद्वारे अवकाशात प्रक्षेपित करणार आहे.
इस्रोची व्यावसायिक कंपनी असलेल्या न्यूस्पेस इंडिया लिमिटेडने (एनएसआयएल) बुधवारी ही घोषणा केली. जीसॅट-२० या उपग्रहाचे नाव बदलून जीसॅट-एन२ असे ठेवले जाणार आहे. अंदमान-निकोबार, लक्षद्वीपसह संपूर्ण देशात दूरसंचार क्षेत्रातील ब्रॉडबँड व अन्य गोष्टींच्या विस्तारासाठी हा उपग्रह अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
इस्रोच्या अवजड उपग्रहांचे जीएसएलव्ही-एमके३ या अग्निबाणाद्वारे प्रक्षेपण केले जाते. मात्र जीसॅट-२० हा ४७०० किलो वजनाच्या उपग्रह फाल्कन-९ या अग्निबाणाद्वारे अवकाशात झेपावणार आहे. एनएसआयएल व अमेरिकेच्या स्पेसएक्समध्ये झालेल्या करारानुसार हे प्रक्षेपण पार पडेल. भारताच्या ग्रामीण भागामध्ये ब्राॅडबँड सेवा, तसेच मोबाइलचे जाळे विस्तारण्यासाठी जीसॅट-२० उपग्रहाचा उपयोग होणार आहे.