आता ड्रोनद्वारे औषधे आणि लसींचा पुरवठा; तेलंगणमध्ये प्रयोगाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 06:21 AM2021-09-12T06:21:04+5:302021-09-12T06:22:52+5:30
औषधी, लसी तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी आता ड्राेनचा वापर करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : औषधी, लसी तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी आता ड्राेनचा वापर करण्यात येणार आहे. तेलंगणामध्ये यासंबंधी पथदर्शी प्रयाेग सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया यांनी केले. नीती आयाेग, वर्ल्ड इकाॅनाॅमिक फाेरम आणि आपाेलाे रुग्णालयाच्या हेल्थनेट ग्लाेबल यांच्यातर्फे तेलंगणामध्ये ‘मेडिसीन फ्राॅम द स्काय’ हा प्रयाेग सुरू करण्यात आला आहे. त्याद्वारे औषधे, लसी, तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंचा दुर्गम भागात पुरवठा करण्यात येणार आहे. तेलंगणामध्ये यासाठी १६ ग्रीन झाेन तयार करण्यात आले आहेत. ज्याेतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले, की आजचा दिवस केवळ तेलंगणाच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी क्रांतिकारी दिवस आहे. केंद्र सरकारच्या नव्या ड्राेन पाॅलिसीमुळे ड्राेनचा वापर करणे साेपे झाले आहे.
१० कि.मी.पर्यंत
तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यात या प्रयाेगाची सुरुवात करण्यात आली. लसी, औषधे, तसेच आराेग्य क्षेत्रातील इतर साहित्यांचा पुरवठा ९ ते १० किलाेमीटरपर्यंतच्या अंतरावर करण्यात येईल. विकाराबादमध्येच १० ऑक्टाेबरपर्यंत प्रायाेगिक तत्त्वावर ड्राेनचा वापर करण्यात येईल.