आता एन्काउंटर सुरू आहे, तुमच्याशी नंतर बोलतो... कर्नल मनप्रीत सिंह यांचा तो कॉल ठरला अखेरचा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 07:24 AM2023-09-15T07:24:12+5:302023-09-15T07:24:50+5:30
Indian Army: ‘आता एन्काउंटर सुरू आहे, नंतर बोलतो,’ असे म्हणत कर्नल मनप्रीत सिंह यांनी फोन कट केला. पण, तो त्यांचा कुटुंबीयांसोबतचा शेवटचा फोन कॉल ठरला, असे त्यांच्या मेहुण्यांनी सांगितले.
श्रीनगर : ‘आता एन्काउंटर सुरू आहे, नंतर बोलतो,’ असे म्हणत कर्नल मनप्रीत सिंह यांनी फोन कट केला. पण, तो त्यांचा कुटुंबीयांसोबतचा शेवटचा फोन कॉल ठरला, असे त्यांच्या मेहुण्यांनी सांगितले. बुधवारी अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीत त्यांच्यासह आणखी ३ जण शहीद झाले होते. कर्नल मनप्रीत सिंह शहीद झाल्याचे वृत्त त्यांच्या पत्नीलाही देण्यात आले नव्हते, ते केवळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. या सर्व शहिदांच्या घरावर शोककळा पसरली, परंतु ते देशासाठी शहीद झाल्याचे सांगत त्यांनी भावनेपेक्षा कर्तव्यभावना मोठी हे दाखवून दिले.
शहीद झालेले कर्नल मनप्रीत सिंह हे चंडीगडचे रहिवासी होते आणि मेजर आशिष धौनक हे पानिपतचे रहिवासी होते. शहिदांच्या घरी सांत्वनासाठी नागरिकांची रीघ लागली आहे.
दोन दहशतवाद्यांना घेरले : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरुवारी अनंतनाग जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना घेरले आहे. काश्मीर पोलिसांनी शहिदांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, आमचे सैन्य दहशतवाद्यांना घेरण्यात निर्धाराने गुंतले आहे.
तो देशासाठी शहीद, मी रडणार नाही
मी वीरपुत्राला जन्म दिला होता. माझा मुलगा देशासाठी शहीद झाला. मी त्याला नमन करीन. मी त्याला माझ्या मांडीवर घेईन, मी रडणार नाही. तो आम्हा सातही जणांना रडवत रडवत निघून गेला.
- मनजीत कौर
(कर्नल मनप्रित सिंह यांच्या आई)
दोन महिन्यांच्या मुलीचे आभाळ हरवले...
n दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्यांमध्ये पोलिस उपअधीक्षक हुमायून भट यांचाही समावेश आहे. हुमायून भट यांना दोन महिन्यांची मुलगी आहे. भट यांचे वडील गुलाम हसन भट हे जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे निवृत्त महानिरीक्षक (आयजी) आहेत.
n मुलाचा मृतदेह घरी आणण्यात आल्यानंतर गुलाम हसन भट यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यावेळी ते काही वेळ स्तब्ध उभे राहिले. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिस दलात नोकरी धोक्याची आहे, हे ते स्वत: महानिरीक्षक राहिलेले असल्यामुळे त्यांना चांगलेच माहीत होते.
नवीन घर पाहिलेच नाही...
मेजर आशिष हे २ वर्षांच्या मुलीचे वडील होते. त्यांचे कुटुंब सध्या सेक्टर-७ मध्ये भाड्याच्या घरात राहते. त्यांनी टीडीआय सिटीमध्ये आपले नवीन घर बांधले होते. त्यांचे मामा महावीर यांनी सांगितले की, ते ३ दिवसांपूर्वी आशिषशी फोनवर बोलले. २३ ऑक्टोबरला आशिष रजा घेऊन नवीन घर पाहायला येणार होते. मात्र, त्यापूर्वीच ते शहीद झाले.