आता शत्रूला भरेल भारताची धडकी; ‘विक्रांत’वर होणार तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 08:03 AM2023-07-14T08:03:03+5:302023-07-14T08:03:31+5:30
२६ राफेल-एम, ३ पाणबुड्यांची खरेदी; पंतप्रधान माेदींच्या फ्रान्स दाैऱ्याआधी मंजुरी
नवी दिल्ली : भारताने गुरुवारी फ्रान्सकडून खास नौदलासाठी तयार करण्यात आलेली २६ राफेल-एम लढाऊ विमाने आणि स्कॉर्पिन श्रेणीच्या ३ पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्याच्या दिवशीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण सामग्री खरेदी परिषदेने (डीएसी) या खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. भारताची ही खरेदी तब्बल ८० ते ८५ हजार कोटी रुपयांच्या घरात जाणारी आहे.
सूत्रांनी सांगितले की, २६ राफेल-एम विमानांपैकी चार विमाने प्रशिक्षण विमाने असतील. राफेल-एम विमान नौदलासाठी डेक-आधारित विकसित प्रकार आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यापासून तीन वर्षांत विमानाची पहिली खेप प्राप्त होईल. किमतीबाबत तपशीलवार वाटाघाटी कराव्या लागत असल्यामुळे कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी एक वर्ष लागू शकेल.
इतर देशांकडून तत्सम विमानांच्या तुलनेने खरेदी किमतीसह सर्व संबंधित बाबींचा विचार करून किंमत आणि खरेदीच्या इतर अटींबाबत फ्रेंच सरकारशी वाटाघाटी केल्या जातील. त्यानंतर, भारताने डिझाइन केलेल्या उपकरणांचे एकत्रीकरण, कार्यवाही हबची स्थापना कराराच्या दस्तऐवजात समाविष्ट केली जाईल.
‘विक्रांत’वर होणार तैनात
अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय नौदल स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेसाठी २६ डेक-आधारित लढाऊ विमाने खरेदी करण्याचा विचार सुरू होता. नौदलाने बोईंग एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट आणि फ्रेंच कंपनी दसॉल्ट एव्हिएशनच्या राफेल विमानांच्या खरेदीसाठी दीर्घ विचारविनिमय केला. त्यात ‘राफेल-एम’ने बाजी मारली. भारतीय हवाई दलासाठी यापूर्वीच फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने खरेदी करण्यात आली.