आता ‘आयएमए’ने गंभीर परिणामांसाठी तयार राहावे; अध्यक्षांनी केलेल्या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 07:18 AM2024-05-02T07:18:32+5:302024-05-02T07:20:27+5:30
आतापर्यंत जे काही घडले त्यापेक्षा ही बाब जास्त गंभीर असून, गंभीर परिणामांसाठी तयार राहा, असा इशारा डॉ. असोकन यांच्या प्रतिक्रियेची दखल घेताना न्या. अमानुल्लाह यांनी मंगळवारी दिला.
नवी दिल्ली : पतंजली आयुर्वेदच्या भ्रामक जाहिराती प्रकरणातील याचिकाकर्त्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. व्ही. असोकन यांनी केलेल्या टिप्पणीवर तीव्र आक्षेप घेत अधिक गंभीर परिणामांसाठी तयार राहा, असा इशारा मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने ‘आयएमए’ला दिला. दरम्यान, पतंजली आयुर्वेदने प्रकाशित केलेल्या भ्रामक जाहिरातींवर कारवाई करीत या कंपनीच्या चौदा उत्पादनांवर तत्काळ प्रभावाने बंदी घातल्याचे प्रतिज्ञापत्र उत्तराखंड औषधी नियंत्रण विभागाने न्यायालयाला सादर केले.
आयएमएने घर नीट करावे, असा शेरा कोर्टाने मारला होता. हे खासगी डॉक्टरांना हतोत्साही करणारे, दुर्दैवी, मोघम आणि सर्वव्यापी स्वरूपाचे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाला न शोभणारे असल्याची प्रतिक्रिया डॉ. असोकन यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. आतापर्यंत जे काही घडले त्यापेक्षा ही बाब जास्त गंभीर असून, गंभीर परिणामांसाठी तयार राहा, असा इशारा डॉ. असोकन यांच्या प्रतिक्रियेची दखल घेताना न्या. अमानुल्लाह यांनी मंगळवारी दिला.
या औषधांवर बंदी
श्वासारी गोल्ड, श्वासारी गोल्ड वटी, दिव्य ब्रोनक्रॉम, श्वासारी गोल्ड प्रवी, श्वासारी गोल्ड अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पॉवर, लिपीडोम, मधू ग्रीट, बीपी ग्रीट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत ॲडव्हान्स, लिवोग्रीट, आयग्रीट गोल्ड.
चौदा औषधांचे परवाने रद्द
पतंजलीच्या १४ औषधांचे परवाने रद्द करून त्यांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले. ही माहिती आयुष मंत्रालयाला देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आदेश मिळाल्यानंतरच कारवाई केलेली दिसते. पतंजलीविरुद्धची इतक्या वर्षांच्या निष्क्रियतेचे काय स्पष्टीकरण आहे, असे विचारत नाराजी व्यक्त केली.
‘पतंजली’च्या माफीनाम्यावर समाधान
मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या पीठाने भ्रामक जाहिरातींसंबंधात पतंजलीने प्रकाशित केलेल्या माफीनाम्याच्या भाषेवर समाधान व्यक्त केले; पण पतंजलीच्या वकिलांनी जाहिराती प्रसिद्ध केलेल्या वृत्तपत्रांचे पूर्ण पान सादर न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
याप्रकरणी सुनावणी १४ मे रोजी होणार असून, पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण, योगगुरू बाबा रामदेव यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट दिली आहे.